छत्रपती शिवाजीमहाराज यांची यापुढे तिथीनुसार एकच जयंती साजरी व्हावी, या दृष्टीने शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, राज्य मंत्रिमंडळासमोर या बाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, असे पालकमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी येथे सांगितले.
शिवजयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार वर्षांतून दोन वेळा साजरी केली जाते. सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, शिवप्रेमी तिथीनुसारही जयंती साजरी करतात. या पाश्र्वभूमीवर राज्यात भाजप युतीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर शिवजयंती एकच साजरी व्हावी, या दृष्टीने शिवसेनेने आता पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. शनिवारी सर्वत्र तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असतानाच कदम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सेनेची या बाबतची भूमिका स्पष्ट केली.
अलीकडेच झालेल्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस पडला होता. सुमारे दोन हजार दाखल तक्रारींपैकी ५०० ते ६०० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारींवर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचेही कदम यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, राज्य मंत्रिमंडळाने यावर लवकर निर्णय घ्यावा, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी या वेळी सांगितले.