संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

औरंगाबाद  : महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन करणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी महिला आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला तिरकस आंदोलन असे नाव देण्यात आले आहे. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार बैठकीत दिली. शिवसेनेने राबवलेल्या ध्वज दिवाळी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून याची नोंद घेण्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या सदस्यांनीही पाहणी केल्याचे ते म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले, केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. २०१४ चे सिमेंट, लोखंडाचे दर आदींसह अनेक वस्तूंच्या दराचा एक फलक केला जाणार असून त्यावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. महिला आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावेळी गॅस एजन्सी, पेट्रोल पंपांना संरक्षण द्यावे, अशी अभिनव मागणीही आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निवेदन पोलिसांना दिले जाणार आहे. सर्व आंदोलने हे जिल्हाभर केली जाणार आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्चानंतरचे निवेदन कोणाला देणार, याची माहिती प्रत्यक्ष प्रसंग येईपर्यंत गुपित ठेवली जाणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरै यांच्यासह इतरही अनेक नेते असल्याचे सांगून दानवे यांनी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनाही त्यांचे नाव अ्सल्याचे जाहीरपणे सांगून पत्रकार बैठकीत चिमटा काढला. उत्पादनशुल्क ३०० पट वाढले असल्याचे सांगून दानवे यांनी एकूणच शिवसेनेने महागाईविरोधातील आंदोलन हा संघटनेकडून आलेला कार्यक्रम असल्याचे म्हटले. आंदोलनाचा येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंध जोडता येणार नाही, असेही ते म्हणाले. शहरात ध्वज दिवाळी या उपक्रमांतर्गत ६० हजारांवर ध्वज लागल्याचा दावा दानवे यांनी केला. पत्रकार बैठकीस माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अर्थराज्यमंत्र्यांचे अधिकार अभ्यासण्याचा विषय

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अलिकडेच विकास कामांशी संबंधित २ हजार कोटींचे प्रस्ताव मनपाकडे पडून असल्याबाबत टीका केली होती. त्याला उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री झाल्यापासून डॉ. कराड हे केवळ घोषणाच करत आहेत. त्यांनी २ हजार कोटीचे खरेच प्रस्ताव दाखल केले असतील, तर ते दाखवावेत. एकाच दिवसात त्यावर कार्यवाही केली जाईल. केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना किती अधिकार असतात हा अभ्यासण्याचा विषय आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.