सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: हनुमान चालिसा, भोंगे त्यानंतर औरंगाबादच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांचे नतमस्तक होणे आदी राजकीय व्यासपीठावर चर्चेलिे जाणारे मुद्दे वगळून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात पाणी प्रश्नीच शिवसेनेला घेरण्याची व्यूहरचना केली असल्याचे भाजपच्या मोर्चातून दिसून आले. गेले काही दिवस शहरात होणाऱ्या भाजपच्या आंदोलनातही फारशी गर्दी वाढत नव्हती. जलआक्रोशच्या निमित्ताने विस्कळीत झालेली संघटन पुनर्बाधणी केल्याचेही दिसून आले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हेच औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचे खलनायक असल्याचे चित्र निर्माण करण्याचा भाजपने केलेला प्रयत्न जसा ‘जलआक्रोशा’चा एक भाग होता तसाच तो  विस्कळीत झालेल्या संघटन पुनर्बाधणीचाही भाग असल्याचे मानले जात आहे. गेल्या १५ वर्षांपासून  अस्तित्वात असणारा पाणीप्रश्न केवळ शिवसेनेमुळेच जन्माला आला व त्याचे अपश्रेय केवळ शिवसेनेचेच असल्याचा असा संदेश जलआक्रोश मोर्चातून देण्यात आला. असे करताना शिवसेना ही भ्रष्ट आहे. त्यांनी निविदा मंजूर करताना घोळ घातले त्यामुळेच नवी पाणी योजना मंजूर करण्यास उशीर झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, मोर्चाच्या निमित्ताने वार्डनिहाय बैठका घेऊन कार्यकर्ते व नगरसेवकांची पुनर्बाधणीही भाजपने साधली. ‘‘जलआक्रोश’ मोर्चा हा पाणी प्रश्नी तळमळीचा भाग कधी नव्हताच तर त्याचे केवळ राजकारण करणे एवढेच त्याचे उद्दिष्ट होते,’ असे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले.

औरंगाबादची पाणीसमस्या गेल्या १५ वर्षांपासून कायम आहे. धरणात पाणी असो की नसो शहरातील पाणीपुरवठा कधी तीन दिवसाला तर कधी पाच दिवसाला होत असे. आजही मराठवाडय़ातील बहुतांश शहराला तीन ते पाच दिवसाआडच पाणी मिळते. लातूर व जालना या दोन शहराला तर कधी दहा दिवसाला तर कधी त्यापेक्षा जास्त दिवसाने कसाबसा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे औरंगाबाद येथील जलआक्रोश मोर्चा पाण्यापेक्षा भाजप राजकारणाचाच भाग अधिक होता असे मानले जात आहे.

नेतृत्व कोणाकडे ?

मराठवाडय़ाचे नेतृत्व कोणाच्या हातात या प्रश्नाचे उत्तर भाजपमध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांची नावे पुढे येत. अलीकडच्या काळात पंकजा मुंडे यांचे नाव प्रदेश भाजपमध्ये कमीत कमी उच्चारले जाईल अशी तजवीज केल्यागत वातावरण आहे. त्यातून डॉ. भागवत कराड हे आता नवे नेतृत्व म्हणून पुढे आणले जात आहे. त्यांनी केलेली मराठवाडा यात्रा, त्यानंतर घेतलेल्या बँकांच्या परिषदा यामुळे डॉ. कराड यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. मात्र, आक्रमक नेता अशी त्यांची ओळख नाही. वादग्रस्त विषयावर बोलणे टाळणाऱ्या डॉ. कराड यांचे औरंगाबाद शहरात नेतृत्व वाढावे यासाठी आक्रमक आंदोलनाची गरज होती. जलआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने डॉ. कराड यांनी संघटनात्मक बांधणी केल्याचे दिसून आले. या मोर्चात भाजपच्या राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे यांची मात्र अनुपस्थिती होती. महापालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांना चालना देण्यासाठी आमदार अतुल सावे यांनीही खासे प्रयत्न केले. त्यामुळे जलआक्रोश मोर्चा हा भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा भाग अधिक असल्याचीही चर्चा आहे. अशी वॉर्डस्तरावरची बांधणी करण्यासाठी शिवसेनेकडून यापूर्वी शिवजयंती उत्सव संघटनबांधणीसाठी उपक्रम म्हणून हाती घेण्यात आला. मशाल मोर्चा, मुस्लीम विद्यार्थ्यांकडून शिवचरित्राचे पठण आदी उपक्रमही हाती घेण्यात आले. प्रत्येक वार्डातून अभिवादन करण्यासाठी मशाल मोर्चा असेही उपक्रम घेण्यात आले होते. या सेनेच्या संघटनात्मक बांधणीला भाजपकडून काही एक प्रतिउत्तर मिळत नव्हते. जलआक्रोशच्या निमित्ताने ते चित्र काहीसे पुढे गेल्याचे दिसून आले.

भाजपची व्यूहरचना

शिवसेना हा भ्रष्ट व्यवस्थेचा भाग आहे आणि ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई असल्याचे सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पाणीप्रश्नी घेरले. खरे तर संभाजीनगर हा नामांतराचा विषय घेऊनही हिंदुत्वावर भाजप नेते बोलतील असे अपेक्षित असताना केवळ पाण्याभोवती शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपकडून आखली जात असल्याचे स्पष्ट झाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena dilemma over water bjp targets shiv sena ysh
First published on: 25-05-2022 at 00:02 IST