शिवसेनेला पाणीप्रश्नी घेरण्याची तयारी; भाजपचा २३ मे रोजी हंडामोर्चा; देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

शिवसेनेला पाण्यावरून घेरण्याच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून भाजपच्या वतीने २३ मे रोजी सायंकाळी चार वाजता हंडामोर्चा काढण्यात येणार आहे.

औरंगाबाद : शिवसेनेला पाण्यावरून घेरण्याच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून भाजपच्या वतीने २३ मे रोजी सायंकाळी चार वाजता हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. भाजपने मंजूर केलेली योजना रद्द केल्यानंतर नव्याने आणलेल्या योजनेमुळे महापालिकेला ४०० कोटी रुपये नव्याने भरावे लागणार आहेत. ती रक्कम कोठून मिळणार, वाढत्या पोलादाच्या किमतीमुळे योजनेचे काम तीन महिन्यापासून बंद आहे. कंत्राटदार दिलेल्या कालमर्यादेच्या खूप पाठीमागे आहे. सध्या सुरू असलेल्या पाणी योजनेचे प्राधान्यक्रमच चुकलेले आहेत. परिणामी २५ कोरडया पाण्याच्या टाक्या चुकलेल्या नियोजनाचा परिपाक आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

या पत्रकार बैठकीस आमदार अतुल सावे, बसवराज मंगरुळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, राजेश मेहता यांची उपस्थिती होती. गेली अनेक वर्षे महापालिकेत एकत्रपणे काम करणाऱ्या भाजपने आता शिवसेना विरोधातील आघाडी अधिक तीव्र केली असल्याचे संदेश पाणी मोर्चातून दिले जाणार आहेत. गेली अनेक वर्षे भाजप हा महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे सारे निर्णय हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारुनच घ्यावे लागत. त्यामुळे महापालिकेत भाजपला स्वतंत्रपणे काम करता आले नाही. त्यामुळे पाणी योजनेतील सर्व चुकीचे निर्णय हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे होते, असा आरोपही पत्रकार बैठकीत करण्यात आला. प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.

 संजय केनेकर यांनी महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यावरही आरोप केले. ते बैठकीत दिलेल्या सूचना ऐकून घेतात, पण केवळ पालकमंत्री सांगतील तेवढेच ऐकतात, असा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला. आमदार सावे यांनी पाणीपुरवठा योजनेत शिवसेनेने घातलेल्या घोळाबाबतची माहिती दिली. ते म्हणाले,की राज्यमंत्री म्हणून काम करताना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६८० कोटी रुपयांची योजना मंजूर केली. सर्व पैसे राज्य सरकारकडून मिळणाार होते. पण ती योजना नाहकच रद्द करण्यात आली. पुढे योजना मंजूर केली, पण आता कंत्राटदार स्टीलच्या किमती वाढल्याने कामच करत नाही. अशा स्थितीत शहरवासीय मात्र हैराण आहेत. त्यांच्या अडचणींची जाणीव सरकारला करून देण्यासाठी हा मोर्चा असेल. या मोर्चात २० हजाराहून अधिक नागरिक सहभागी होतील, असेही सांगण्यात आले. 

भाजपचे आंदोलन म्हणजे नाटकीपणा

भाजपचे हे आंदोलन म्हणजे नाटकीपणा आहे. जेव्हा भाजप खासदाराला समांतर पाणीपुरवठय़ाची निविदा मिळणार होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, योजनेला विरोध करू नका असा दबाव आणला होता. आता तेच फडणवीस विरोध करायला कोणत्या तोंडाने पुढे येत आहेत? शिवसेनेने तर पाणीपट्टीत ५० टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर करून औरंगाबादकरांना वेडे बनविण्याचाच विडा उचलला आहे. त्यामुळे या दोघांनाही पाणी प्रश्नाचे काही एक देणे-घेणे नाही, अशी टीकात्मक प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली. हिंमत असेल तर फडणवीस यांनी एकटय़ाने एखाद्या वॉर्डात फिरुन महिलांना विचारावे, त्या काही ऐकून घेण्याऐवजी डोक्यात हंडा घालतील, असेही जलील म्हणाले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena ready face water issue bjp strike presence devendra fadnavis ysh

Next Story
तथागतांच्या तत्त्वज्ञानाला सुलेखनातून भावस्पर्श
फोटो गॅलरी