नांदेड : येथील इ-स्क्वेअर हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी आयोजित शिवसेना (शिंदे गटा)च्या विभागीय बैठकीत अंतर्गत वादाचा भडका उडाला. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी थेट स्वपक्षीय मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ‘आसूड’ ओढले, तर नांदेडमधील शिवसैनिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शिवसेना नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत व गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घडला. दरम्यान, बैठकीत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची खा. शिंदेंनी चांगलीच कानउघाडणी करत शिस्तीत राहण्याचा सल्ला दिला.

नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दुपारी साडेचारची वेळ असतानाही नेतेमंडळींच्या विलंबामुळे ही बैठक सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झाली. बैठकीत सुरुवातीला खा. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक आढावा घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी तक्रारींचा पाढा वाचला गेल्याने बैठकीतील वातावरण तापले.

हिंगोलीचे आ.संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्र्यांवर निशाणा साधला. “शिवसेनेचे काही मंत्री आमचे फोन उचलत नाहीत, प्रत्यक्ष भेटायला गेल्यास दाद देत नाहीत. आमच्या भागातील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,” असा खळबळजनक आरोप करत बांगर यांनी अशा मंत्र्यांना समज देण्याची मागणी खा. शिंदे यांच्याकडे केली. आमदारानेच मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बैठकीत सन्नाटा पसरला होता.

दुसरीकडे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबतही शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी थेट सवाल केला की, “महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्या, पण केवळ तीनच नगरसेवक निवडून आले. ३५०० कोटींच्या विकासकामांचा दावा केला जात असेल, तर मग उमेदवारांचा पराभव का झाला?” तिकीट वाटपात झालेल्या चुकांना आ. कल्याणकरच जबाबदार असल्याचा थेट उल्लेख देशमुख यांनी केला.

खासदार श्रीकांत शिंदे चिडले!

बाळासाहेब देशमुख आपले गाऱ्हाणे मांडत असताना काही कार्यकर्त्यांनी वारंवार व्यत्यय आणला. हा गोंधळ पाहून खा. श्रीकांत शिंदे यांचा संयम सुटला. त्यांनी तातडीने उभे राहून गोंधळ घालणाऱ्यांची ‘कानउघाडणी’ केली. “मला येथील सर्व परिस्थिती माहिती आहे. कोण कोणाबद्दल नाराज आहे, हे देखील ठाऊक आहे. मी सर्वांचे म्हणणे ऐकायला आलो आहे, त्यामुळे शांततेत राहा आणि शिस्तीचे पालन करा,” अशा कठोर शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

एकजुटीचे आवाहन

बैठकीच्या उत्तरार्धात मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी गटबाजी बाजूला ठेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला आमदार हेमंत पाटील, आनंदराव बोंढारकर, आ. संतोष बांगर, आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.