छत्रपती संभाजीनगर : कर्ज वितरणामध्ये पतमानांकन करणाऱ्या ‘सिबिल’ कंपनीने ठरवून देणाऱ्या निकषाच्या आधारे पीक कर्ज करू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी बँकांसमोर आंदोलन करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेत जाऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. पीक कर्जासाठी किती अर्ज आले, किती निकाली काढले त्यातील ‘सिबिल’ या पतमानांकन करणाऱ्या कंपनीने दिलेल्या निकषामुळे किती अर्ज नाकारले, याची माहिती शिवसैनिकांसह जाऊन विचारली. सिबिल पतमानांकन पीक कर्जासाठी पाहिले जात नसल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला. पीक कर्जाव्यतिरिक्त अन्य मध्यम मुदतीचे कर्ज देताना ते निकष लक्षात घेतले जातात, असे सांगण्यात आले.
मराठवाड्यात अनेक बँकांमधून कर्ज नाकारले जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी या वेळी केला. कोणतेही तांत्रिक कारण दाखवून बँक अधिकारी कर्ज नाकारत आहेत. त्यामुळे पेरणी सुरू झाल्यानंतरही पीक कर्ज मिळत नाही, असे सांगण्यात आले. बँक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत उद्दिष्टाच्या ४२ टक्के कर्ज वाटप झाल्याची आकडेवारी शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठेवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५९६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करावे, असे उदि्दष्ट होते. यातील ६७० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. सिबिल पतमानांकन पाहून कर्ज नाकारले जात नाही, असा बँक अधिकाऱ्यांचा दावा होता. पीक कर्जात हा निकष लावला जात नसल्याचे ते सांगत आहेत. ज्या कर्जदाराचे हप्ते वेळेवर भरले जात नाहीत अथवा ते थकीत असतात त्याचे पत मानांकन घसरलेले असते.
चांगले ‘सिबिल ’म्हणजे काय?
सिबिल ही पतमानांकन ठरविणारी कंपनी आहे. एखाद्याचे कर्ज थकले असेल किंवा कर्ज घेऊन त्याचे हप्ते वेळेवर परतफेड होत नसतील, तर त्याचे पत मानांकन गुण ६५० पेक्षा कमी असतात. अशा प्रकरणांत बँक अधिकारी कर्ज नाकारतात. मात्र, ज्या बँकेत अर्ज करण्यात आला आहे त्या बँका अन्य बँकांकडे शेतकऱ्याचे कर्ज थकीत आहे का, याची तपसणी करतात. सिबिल गुण तपासत नाहीत. मात्र, तो थकबाकीदार आहे की नाही, याची तपासणी केली जाते. साधारणत: वेळेवर कर्जफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांचा सिबिल गुणांकन ८०० पेक्षा अधिक असते. किती वेळेवर कर्ज परतफेड होते यावर हे गुणांकन केले जाते.