जालना – लाडक्या बहिणींसह विविध योजना राबविणारे एकनाथ शिंदे यांना २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे.त्यासाठी सर्व महिलांनी पदर खोचून कामाला लागावे असे आवाहन खासदार ज्योती वाघमारे यांनी येथे केले. शिवसेनेच्या ‘शिवदुर्गा संवाद ‘ दौरा कार्यक्रमात बोलताना वाघमारे म्हणाल्या, बऱ्याच कार्यक्रमात नेते येतात, बोलतात आणि निघून जातात.
कार्यकर्त्यांना खुर्च्या आणि सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागते. परंतु शिंदे यांनी सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविले पाहिजेत, म्हणून शिवदुर्गा संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्यातील या शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात जालना येथून होत आहे.आम्ही पोस्टमनच्या भूमिकेत आहोत.
संघटना वाढीसाठी महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सूचना याचा तपशीलवार अहवाल आम्ही आपले शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला. याशिवाय लेक लाडकी योजना, एसटी सवलत अशा अनेक योजना महिलांसाठी राबविल्या.
महिलेने नऊ महिने पोटात बाळ वाढवायचे, त्याचे पालनपोषण करायचे परंतु त्या बाळाच्या नावापुढे नाव लागत होते ते वडिलांचे! या प्रकाराची संवेदनशील दखल घेत शिंदे यांनी बाळाच्या नावापुढे आधी आईचे आणि नंतर वडिलांचे नाव लावायचे हा ऐतिहासिक निर्णय घेतला. पुढील काळात महिलांसाठी विधानसभा, लोकसभेत आरक्षण असणार आहे.
त्यामुळे महिलांनी शाखा स्थापन करणे, सदस्य नोंदणी करणे, बूथ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पक्ष विस्तार करताना कुणाचा दबाव येत असेल, कुणी दडपशाही करीत असेल तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे शिवसैनिकाला सांगण्याची गरज नाही असेही वाघमारे म्हणाल्या. यावेळी शायना एन.सी. यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघात पक्ष वाढविण्याचे आवाहन केले. माजी आमदार संगीता ठोंबरे, उपनेत्या कला शिंदे,महानगरपालिका सदस्या दर्शना झोल- खोतकर, विजया पोटे, प्रीती बंड यांनी उपस्थित महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन संघटना वाढीसाठी सूचना केल्या.
दर्शनाताई खोतकरांचे मार्गदर्शन
शिवसेनेच्या युवा नेत्या तथा नगरसेविका दर्शनाताई खोतकर म्हणाल्या की, एक काळ असा होता की पदावर महिला आणि काम पती पाहायचे. आता मात्र महिला पुढे येऊ लागल्या आहेत. एका हाकेवर आजच्या शिवदुर्गा संवादासाठी मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. शिवसेनेने महिलांसाठी खूप योजना राबविलेल्या आहेत. त्यापैकी लाडकी बहीण ही स्टार योजना गेमचेंजर ठरली आहे. आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी लाडक्या बहिणी योजनेचा जिल्ह्यातील सर्वाधिक महिलांना लाभ मिळवून दिला आहे.
नगरविकास खाते शिवसेनेकडे असूनही जालना पालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. आगामी काळात जालना जिल्ह्यात महिला संघटना बळकट झालेली दिसेल, असे काम करू अशी ग्वाही दर्शनाताई खोतकर यांनी दिली. राज्य पातळीवर महिलांचा एक नवदुर्गा संवाद मेळावा नवरात्रीच्या सुमारास मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्याबाबत सूचना आपण केली असल्याचे उपनेते आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.माजी नगराध्यक्ष आणि पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर, युवा शिवसेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर आणि इतरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
