छत्रपती संभाजीनगर : लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी घटनात्मक आणि राजकीय पदे भूषवलेले नेते म्हणून ओळख असलेले ॲड. शिवराज पाटील चाकूरकर यांचा अध्यात्माचाही अत्यंत दांडगा अभ्यास होता. परळीत २०१८ साली पार पडलेल्या एका आध्यात्मिक तपोनुष्ठान कार्यक्रमाला हजेरी लावून चाकूरकर यांनी ‘विज्ञान-अध्यात्म आणि बसवेश्वरांचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले तेव्हा एखादा नेता अध्यात्माच्या क्षेत्रातील चिंतनशील निरुपण करू शकतो, याची प्रचिती परळीकरांना आली होती. चाकूरकरांना ऐकण्यासाठी तब्बल २५ हजारांच्या संख्येने समुदाय एकत्र आला होता.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या परिसरात २ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ८२ व्या मौनमुक्ती सांगता तपोनुष्ठानच्या सोहळ्याला ॲड. चाकूरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाकूरकर यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड आणि परस्परपूरक बाजू मांडणारे मार्गदर्शन केले होते.

या कार्यक्रमाचे संयोजक चेतन सौंदळे यांनी सांगितले, की चाकूरकर यांचा चौफेर व्यासंग पाहता त्यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या मतानुसार एक विषयही मांडणीसाठी देण्यात आला होता. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी केली होती. त्यांचा भारतीय संस्कृतीचाही सखोल अभ्यासक असल्याचे त्यांच्या निरुपणातून आम्हाला कळाले. एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लोप पावले. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून झालेले असल्यामुळे चाकूरकर यांचे हिंदी, इंग्रजीसह ऊर्दू भाषेवरही प्रभुत्व होते.

विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचे महत्त्व जाणून त्यांची एक योग्य ती सांगड घालून त्याचा विश्व कल्याणासाठी अखंड प्रसार आणि प्रचार केलेले राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आयुष्यभर समाजोन्नतीसाठी चंदनासारखे स्वतःचे आयुष्य झिजवले. त्यांनी व म.बसवेश्वर महाराजांनी वेळोवेळी दिलेली वीरशैव तत्वज्ञानाचे व आचार विचाराचे तत्त्व आपण सर्व जणांनी अंगिकारून त्याचा एकजुटीने व नेटाने प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले होते, असे चेतन सौंदळे यांनी सांगितले.