औरंगाबाद शहरात असणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या मुद्द्यावर पालिकेत विशेष सभा घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शहरात अकराशेहून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळ आहेत. मंदिर आणि मशिद यांचा यामध्ये समावेश आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्याचा विषय निघला की, धार्मिकतेचा मुद्दा पुढे केला जातो. मात्र कारवाई होत नाही. सध्या उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यावर धार्मिक स्थळावरील कारवाईबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करावी, अशी मागणी शिवसेनेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी केली.

शिवसेना नगरसेवक राजू वैध यांनी मागणीच पत्र दिलं असून खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र ऋषीकेश खैरे आणि सिद्धांत शिरसाट यांच्यासह इतर सदस्यांची त्यावर स्वाक्षरी आहे. पालिकेकडून कोणत्या धार्मिक स्थळांचा अनधिकृत यादीत समवेश केला आहे. तो कशाच्या आधारावर केला. याची माहिती सर्वसाधारण सभेत द्यायला हवी. विकास कामला आमचा विरोध नाही. मात्र धार्मिक भावना दुखावू नये, यासाठी कोणत्या स्थळांचा समावेश केला त्याची पालिकेत चर्चा व्हायला, हवी असे मतं शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र आणि स्थाई समितीचे सदस्य ऋषीकेश खैरे यांनी व्यक्त केले.

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयचे आदेश असताना पालिकेकडून कारवाई करण्यास विलंब होत आहे. राजकीय आणि सामाजिक दबावामुळे कारवाईला विलंब होत असल्याचं बोललं जात आहे. कोर्टाचे आदेश आल्याने सध्या पालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईची पूर्व तयारी करण्यात आली असून चार पथक तयार करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.