छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक. पण जेवढी ताकद तेवढीच अंतर्गत धुसफूस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत दूरध्वनीवरुन पोहचलेला वाद त्यांचे सुपूत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर रविवारी प्रत्यक्षात आवर्जून मांडण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाठ हे शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत, असे उपमहापौर व जिल्हा प्रमूख राजेंद्र जंजाळ यांनी जाहीरपणे सांगितले. त्यावर ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही नीती अवलंबली जात असल्याचे सांगत शिरसाठ यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या ‘बांधणी’ला आता नव्याने वादाची फोडणी मिळाली आहे. नेते आणि पदाधिकाऱ्यातील वाद शिवसेना एकसंघ असतानाही होता आणि शिवसेना फुटीनंतरही तो कायम आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत राहून पक्ष बांधणी करायची कशी, असा पेच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासमोर निर्माण झाला आहे.

शिवसेनेची वाढ ही सत्ता विरोधी विचारातून झालेली. मराठवाड्यातील सरंजामी मानिकतेच्या विरोधात उतरणाऱ्या ग्रामीण भागातील युवकास साथ मिळत गेले. याच काळात हिंदूत्त्वाचा मुद्दा अधिक विस्तारत गेला. गावोगावी शिवसेना वाढत गेली. देशभरात कोठेही ‘ हिंदू राष्ट्र चौक ’ नावाचं ठिकाण नसेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये असा भाग आहे. हे का सांगायचे कारण भाजपच्या विचारधारेची अंमलबजावणी शिवसेना आपल्या पद्धतीने करत असे. शिवसेनेतील फुटीनंतर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर भाजपने दिल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची वाढ रोखण्यात भाजपला यश मिळाले. त्यामुळे आवाज कुणाचा अशी घोषणा आता क्षीण होऊ लागली आहे.

ठाकरेची शिवसेना मराठवाड्यात कमकुवत झाली असली तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नगरपालिकांमध्ये यश मिळत गेले. नव्या शिवसेनेकडे मराठवाड्याच्या विकासाचे कोणतेही प्रारुप नाही. ज्या ‘ जय भवानी, जय शिवाजी ’ घोषणेवर एकसंघ शिवसेनेची वाढ झाली त्या घोषणेचा आवाज आता भाजप बुलंद करीत आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर बांधणीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

५२ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या आक्रसली आहे फक्त ७१ वर आली. भाजपच्या नगरसेवकांची संख्या आहे ३६५ आणि आश्चर्य असे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या आहे ३०२ एवढी. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही फारसं बाळसं धरते आले नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक आहेत १५९. म्हणजे भाजपच्या निम्मेच. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तर शिंदे सेनेला बाजूला ठेवण्यापर्यंत भाजपची खेळी यशस्वी झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरात मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी महापौरांची संख्या सात होती. पण महापालिकेत म्हणावे तेवढे यश आले नाही. त्यास पालकमंत्री आणि जिल्हा प्रमुखांचा वाद कारणीभूत होता. तीच स्थिती जिल्हा परिषदेमध्येही झाली. आपापले नातेवाईक विविध स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये घुसविण्याच्या स्पर्धा अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांनी केली. परिणामी हातून सत्ता गेली. आता वाढीचे प्रश्नही कायम आहेत. नांदेडमध्ये आनंद बोंडारकर, बाबुराव कोहळीकर आणि बालाजी कल्याण हे निवडून आलेले आमदार आणि विधान परिषदेवर हेमंत पाटील यांची निवड झाल्यानंतरही नांदेडमध्ये शिवसेनेची वाढ झाली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मंत्री शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, संजना जाधव, अब्दुल सत्तार एवढे आमदार आणि संदीपान भुमरे खासदार अशी ताकद असताना जिल्ह्यातील वाढ खुटलेलीच. हिंगोली शहर आणि कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला आणि मोठ्या भावाच्या पत्नींना नगराध्यक्ष पद देण्यात आले. वसमतमध्येही शिवसेना राष्ट्रवादीमध्ये सत्तेत आहे. पण बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेची वाढ खुंटलेली. मराठवाड्यातील जातीचे गणिते आणि मुंंबईहून मिळणारी ‘ ताकद ’ या जोरावर कसे वाढायचे असे प्रश्न असताना सेनेतील वाद हा एकनाथ शिंदे यांच्यासमोरील मोठी समस्या असणार आहे. त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संघटन बांधणीचा प्रश्न हाती घेतला आणि जाहीर कुरबुरी समोर आल्या.