जालना: आरक्षणाच्या मुद्यावरून लांबणीवर पडलेल्या जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जालना जिल्हयातील पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी येथे झाली.
आमदार अर्जुन खोतकर, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, मंत्री संजय शिरसाठ, आमदार अब्दुल सत्तार, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासकीय समित्यांच्या संदर्भात भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी केल्या.
बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बळ असले तरी तेथील महायुती मधीलभाजपचे आमदार नारायण कुचे स्थानिक पातळीवरील शासकीय समित्यांच्या नियुक्तीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांना डावलत असल्याची तक्रार तेथील पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपचे आमदार असलेल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक ‘महायुती’ मध्ये मिळत असून स्थानिक पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये डावलण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.
जाफराबाद आणि अंबड तालुक्यांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अशाच स्वरुपाच्या तक्रारी केल्या. यावेळी खासदार शिंदे म्हणाले, जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ५७ गट आणि पंचायत समित्यांच्या ११४ गणांची निवडणूक ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून लांबणीवर पडलेली आहे. या अनुषंगाने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आहेत. कार्यकर्ता काय काम करीत असतो याची नोंद पक्ष घेत असतो. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे.
जालना, भोकरदन आणि बदनापूर या तीन विधानसभा मतदार संघांतील पक्ष संघटनेच्या कामांचा आढावा खासदार शिंदे यांनी या वेळी घेतला. ‘ तत्पूर्वी खासदार शिंदे यांनी जालना शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील शेतकरी आणि अन्य क्षेत्रांतील व्यक्तींशी एका बैठकीत चर्चा केली. आमदार अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत शहर विकासाच्या अनुषंगाने अनेक सूचना करण्यात आल्या.
या बैठकीत डाॅ.संजय राख यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद उमेदवारीचा विषय उपस्थित केला. डॉ. राख म्हणाले, आपले घराणे काँग्रेसचे आहे. परंतु या भागाच्या विकासासाठी पालकमंत्री जिल्हयाकडे असावे म्हणून अर्जुन खोतकर यांना शिवसेनेने मंत्रीपद दिले पाहिजे.तसेच माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांना शिवसेनेने विधान परिषद स्थानिक स्वराज्य मतदार संघातून उमेदवारी दिली पाहिजे.आपली ही मागणी अराजकीय असून या भागाच्या विकासासाठी आहे, असेही ते म्हणाले.
