छत्रपती संभाजीनगर : आयोद्धतील राममंदिर उभारणीतील गैरव्यवहारांच्या सर्व बातम्यांची कागदपत्रे घेऊन राज्यातील साधूसंताना भेटण्याचे अभियान शिवसेनेच्या ठाकरे गटाने हाती घेतले आहे. हे काम माजी खासदार चद्रकांत खैरे यांच्याकडे सुर्पूद करण्यात आले आहे. बुधवारी परभणी जिल्ह्यातील नरेंद्र स्वामी महाराजांना भेटून या मोहिमेची सुरुवात करण्यात येईल असे खैरे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत जाहीर केले. या निमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर ‘ श्रीराम ’ आणि ‘ हनुमाना ’ची मूर्तीही आवर्जून ठेवण्यात आली.
राम मंदिर आंदोलनाच्या आधारे ‘ हिंदूत्वा’ चा मुद्दा भाजपने पुढे नेला. शिलान्यासापासून ते आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर रामभक्त म्हणून आपणही सहभागी झालो होतो. अयोद्धेमध्ये राम मंदिर उभा ठाकले तेव्हा त्याचा आपणास अभिमान वाटत होता. या आंदोलनातील सेवक म्हणून तेव्हा एक लाख ११ हजार १०१ रुपयांची देगणी दिली होती. अगदी आईनेही २५ हजार रुपये दिले होते. अनेकांनी निधी दिला. विदेशातूनही मोठा निधी आला. पण त्यात झालेल्या गैरव्यवहाराने मन व्यथित झाले. यातून ‘ हिंदू धर्माची ’ बदनामी होत आहे. या सर्व प्रश्नावर साधू व संतांची भूमिका अधिक स्पष्ट व्हावी, त्यांनीही या प्रश्नी आवाज उठवावा म्हणून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील नरेंद्र स्वामी महाराज तसेच गंगागिरी महाराज, शांतीगिरी महाराज, अण्णासाहेब मोरे महाराज यांची भेट घेणार असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुखांनी एक आंदोलन केले आणि ते आंदोलन संपले असे होणार नाही. या पुढे प्रत्येक गावात ‘ रामरक्षा ’ आंदोलन हाती घेतले जाणार आहे. या मोहिमेतून रामाच्या नाव घेऊन भाजप नेत्यांनी हिंदूंना कसे फसवले आहे, हे आम्ही सांगू असे खैरे म्हणाले. प्रत्येक गावात रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणून हा कार्यक्रम होईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघातील प्रमुखांचीही भेट घेऊन वर्तमानपत्रातून आलेल्या गैरव्यवहारांची कात्रणे देणार असल्याचे खैरे म्हणाले. बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे ‘ गर्व से कहो हम हिंदू है ’ या प्रचाराला बळ आले होते. आता पुन्हा तीच भूमिका घेऊन आधी संत आणि साधूंना गैरव्यवहाराचा विषय समजावून सांगू, असे खैरे यांनी सांगितले.
