परभणी : भारतीय जनता पक्षाएवढा भ्रष्ट पक्ष दुसरा कोणताच नाही. या लोकांनी सगळा देश लुटून खाल्ला आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी अदानी आणि अंबानी या दोघांचे भले केले.भाजपच्या लोकांनी अफाट पैसा कमावला आहे. यांचे पैसे घ्या पण मतदान उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेला करा यांचा पैसा कष्टाचा नाही असे आवाहन ‘उबाठा’ शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी येथे केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा निर्धार मेळावा येथे पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, आमदार डॉ. राहुल पाटील, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार जाधव म्हणाले, एकदा सगळ्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्यात समन्वय असायला हवा. जर आपल्यात समन्वय नसेल तर काहीही हाती लागणार नाही. निवडणुकीच्या काळात आमचे दुश्मन आम्हीच असे होता कामा नये. आमदार राहुल पाटील यांच्याशी आपले काही वाकडे नाही. जर आमच्या दोघात मतभेद असतील तर आम्ही दोघेही तीन-तीन वेळा निवडून आलो नसतो. आणि जरी आमच्यात काही असेल तरी ते आमच्या पुरते मर्यादित ठेवू. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत शेण खाण्याचे काम करणार नाही.
खासदार जाधव यांनी यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. मुस्लिम समाजाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये. या राष्ट्रवादीला मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत आहे. एकीकडे या पक्षाचे संग्राम जगताप यांच्यासारखे आमदार दररोज मुसलमानांच्या विरोधात भाषण करत आहेत अशावेळी मुस्लिमांना राष्ट्रवादीचा पुळका येता कामा नये. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाले ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा करतात. जातीच्या, धर्माच्या नावावर वातावरण दूषित करतात. मुस्लिम व दलित समाजाने आता महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहायला हवे असे आवाहन यावेळी खासदार जाधव यांनी केले.
परभणीची लोकसभा, विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात येथे मग महापालिका शिवसेनेच्या ताब्यात का येत नाही असा प्रश्न यावेळी खासदार जाधव यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित केला. भाजपच्या लोकांनी अफाट पैसा कमावला आहे. यांचे पैसे घ्या पण मतदान उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेला करा. यांचा पैसा कष्टाचा नाही अशी टीका करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले असा प्रश्न यावेळी खासदार जाधव यांनी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांनी कितीही पैसा वापरला तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एकजूट पुरून उरेल आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात माजी उपमहापौर माजीद लाला, सय्यद इकबाल, दिलीप ठाकूर, नंदकिशोर दरक, श्याम खोबे, सुनील जाधव आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
