औरंगाबाद : मराठवाडय़ातील प्राणवायूची मागणी १५७ मेट्रिक टन असून तेवढा पुरवठा करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. कट्टाकट्टी प्राणवायूचा पुरवठा असल्याने हैदराबादहून ऑयनॉक्स कंपनीकडून, तर बेल्लारीहूनही प्राणवायू आणला जात आहे. पण त्या पुरवठय़ाच्या वारंवारितेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही संशय आहे. प्राणवायू पुरवठा कट्टाकट्टी आणि रेमडेसिविरचा तुटवडा यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. दरम्यान पैठण तालुक्यातील एका स्टील कंपनीतील पुरवठा अधिग्रहित करण्यात आला असला तरी जालना येथील बहुतांश कंपन्या सध्या बंद असल्याने त्यांना होणारा पुरवठा पूर्णत: थांबविण्यात आला असल्याची माहिती, अन्न व औषधी प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे यांनी दिली.

बीड, नांदेड, लातूर येथील ऑक्सिजनच्या पुरवठय़ाबाबत कसरत करावी लागत असून द्रवरूप प्राणवायू पुरविणाऱ्या प्रत्येक टँकरवर आणि पुरवठय़ावर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. दरम्यान गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकारतर्फे जाहीर झालेल्या निर्बंधांची अंमलबजावणी गुरुवारी सुरू झाली. प्रत्येक चौकात पोलीस उभे असले तरी अनेकजण वेगवेगळी कारणे देत दुचाकी आणि चारचाकीमधून फिरत असल्याचे दिसून आले. कोणाचे काम किती प्राधान्याचे हे ठरविण्यासाठी पोलिसांची दमछाक होत होती. एका बाजूला रुग्णसंख्या कमालीची वाढत असताना बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा फार कमी झाल्याचे दिसून आले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात पहाटे फिरायला येणाऱ्यांची संख्याही फारशी घटलेली नव्हती. तर दिवसभरात प्रत्येक सिग्नलवर गर्दी होती. अनावश्यक स्वरूपातील खरेदीही सुरू होती. पोलीस जागोजागी नागरिकांना विचारत असले तरी त्यांना चुकवून सारे व्यवहार करण्याकडेच औरंगाबादकरांचा कल होता. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा वाढत असून बुधवारी रात्रीच्या अहवालानुसार १७१८ जणांना करोना लागण झाली. त्यात शहरातील बाधितांची संख्या ७७१होती, तर ग्रामीण भागातील आकडा ९४७ एवढा होता. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार देण्याऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात संदर्भित केले जाते. त्यामुळे खाटांची समस्या कायम आहे.

व्हेंटिलेटर क्षमतेवर प्रश्नचिन्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केंद्र सरकारच्या वतीने १०० व्हेंटिलेटर पाठविण्यात आले. मात्र, त्यांची क्षमता कमी असल्याचे सांगण्यात आले. प्राणवायू देण्याची क्षमता अधिक असणाारे व्हेंटिलेटर नसल्याने त्याचा फारसा उपयोग नसल्याचे घाटी प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान यंत्र मिळाले तरी मनुष्यबळ कोठून आणायचे असा प्रश्न आहे. पूर्वी पुरवठा करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करण्यासाठी ढिसाळपणा करण्यात आला होता. राजकीय नेत्यांनी प्रश्न उचलून धरल्यावर आता दुरुस्ती पूर्ण झाली आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मनुष्यबळावर मात करण्यासाठी विविध पदाच्या तातडीच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.