छत्रपती संभाजीनगर – भारत-पाकिस्तानच्या एका युद्धात शहीद झालेल्या एका सैनिकाचे कुटुंब आजही जमीन मिळण्यापासून वंचित आहे. लातूरमधील एका कुटुंबातील सदस्याने जमीन मिळण्यासाठी प्रयत्न केले असता तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी एक अहवालच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ठेवला आहे. खंडपीठाने या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी आठ आठवड्यात निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

लातूरच्या देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्रीरंग बिरादार यांच्या वारसांना पाच दशके लोटूनही अद्यापही शासनाकडून जमीन देण्यात आली नाही. जिल्ह्यात शहिदाच्या वारसांसाठी जमीन शिल्लक नसल्याचा अहवाल लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा खंडपीठात आला. न्या. अरूण पेडणेकर व न्या. वैशाली पाटील-जाधव यांनी शासनाच्या नवीन धोरणानुसार विभागात जमीन शोधण्याचे आदेश दिले.

श्रीरंग बिरादार भारत पाकिस्तान युद्धात १७ सप्टेंबर १९६५ मध्ये शहीद झाले. श्रीरंग युद्धावर असताना सुमित्राबाई गरोदर होत्या. त्यांच्या वीरमरणापूर्वी वीरपत्नी सुमित्राबाई यांनी पांडुरंग नावाच्या पुत्राला १२ जून १९६५ मध्ये जन्म दिला. सुमित्राबाई यांनी २००६ मध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे शहिदाच्या वारसांना मिळणाऱ्या जमिनीची मागणी केली होती. जमीन मिळत नसल्याने पंधरा वर्षांनंतर २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. आशिष देशमुख यांच्या वतीने एक याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी सुरू असताना ५ ऑगस्ट २०२४ मध्ये वीरपत्नी सुमित्राबाई यांचे निधन झाले. याचिका पुढे पुत्र पांडुरंग बिरादार यांनी सुरू ठेवली.

जिल्हाधिकारी लातूर यांनी तीन महिन्यात प्रकरण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करावे. विभागीय आयुक्तांनी विभागात आठ आठवड्यात जमीन शोधून द्यावी असे आदेशित केले आहे.

कुटुंबाकडे इंदिरा गांधींचे पत्र

शहीद श्रीरंग बिरादार यांच्या कुटुंबाकडे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाठवलेले एक पत्र असून, हे पत्र त्यांनी जीवापाड जपले आहे. या पत्रात इंदिरा गांधी यांनी शहीद कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. शहीद कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असल्याचे इंदिरा गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.