छत्रपती संभाजीनगर – सिल्लोड तालुक्यातील एकाच गावातील एक अल्पवयीन मुलगी व एका तरुणाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह रात्री सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतांवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजिंठा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी साडे पाच सुमारास अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेच्या काही वेळानंतरच गावात जीवन संजय मानकर (वय २०) या तरुणानेही शेतात गळफास घेतल्याची माहिती पुढे आली. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

दोन आत्महत्या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मुलीची आत्महत्या तिच्या राहत्या घरी तर जीवनने शेतात जाऊन गळाफास घेतलेला आहे. दोन्ही आत्महत्यामागचे कारण समजू शकले नाही. या घटनेमागे प्रेमप्रकरणाचे काही पदर जुळतात का, या दृष्टीनेही धागेदोरे पाहिले जातील. आमचा तपास सर्वच अंगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.