औरंगाबाद : वंचित आणि त्यातही गुन्हेगारीकरणाचा शिक्का बसलेल्या घटकांतील ७५ तरुणांना त्यांचे कौशल्य पाहून प्रशिक्षण देऊन कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. या तरुणांना कुठल्याही गुन्हेगारीच्या घटनेनंतर पोलीस उचलून नेऊन गुन्हा दाखल करत असायचे. लघु उद्योग भारतीच्या जालना शाखेतील पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती शनिवारी येथे दिली.

लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा स्तरीय जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी येथे आयोजित पत्रकार बैठकीत संघटनेकडून करोनानंतरच्या परिस्थितीचा अंदाज बांधून आखणी केलेल्या पुढील कामाची दिशा, धोरण, नवे संकल्प आदींची माहिती देण्यात आली. शिकलकरी समाजाकडे अनेक वस्तु तयार करण्याचे कौशल्य असते. अंगभूत मेहनतीचा गुण असलेल्या या समाजाकडे अनेक कौशल्ये असली तरी त्यांच्यातील तरुणांकडे गुन्हेगारीच्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर काहीशा संशयाने पाहिले जाते. एकप्रकारे या समाजावर गुन्हेगारीचा शिक्काच बसला आहे. जालना लघु उद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजातील तरुणांशी संवाद साधून त्यांना वेल्डर, फिटर आदींसह इतरही अनेक कौशल्याचे प्रशिक्षण दिले. आज ७५ तरुण पूर्णपणे प्रशिक्षित होऊन क्षमतेने कंपन्यांमध्ये नोकरी करत असून त्यांची पुढील पिढीही शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. कंपन्यांमध्ये लागणारे मनुष्यबळ ओळखून याच पद्धतीने काम करण्याचा मानस आहे, असे जालना येथील पदाधिकारी अविनाश देशपांडे व लघु उद्योग भारतीचे मराठवाडा विभागाचे अ्ध्यक्ष अशोक राठी यांनी सांगितले. जालना लघु उद्योग भारतीतील सदस्यांचा कुटुंबासह एक चीनमध्ये अभ्यास दौराही आयोजित करण्यात आला होता. जालन्यात १५० संघटनेचे सदस्य असल्याचीही माहिती राठी यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी करोना परिस्थितीत अनेक लघु उद्योजकांचे हाल झाले अ्सून त्यांच्या कुटुंबातील तरुण पिढी आता या क्षेत्रात येण्याचा विचार करत नसल्याचे पाहून व नवे उद्योजक तयार करण्यासाठी लघु उद्योग भारती यापुढे काम करणार असल्याचे सांगितले. भारत सरकारचे लघु उद्योगांबाबतचे धोरण, आर्थिक साक्षरता, उद्योग वाढवण्याबाबत एक आखीव नियोजन, विपणन, मनुष्यबळ वाढ आणि कालसुसंगत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आदीं बाबींवर संघटना काम करणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रातील मंत्री नारायण राणे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबतही लघु उद्योगांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. लघु उद्योग भारतीचे देशात ३२ हजार, राज्यात २२००, मराठवाडय़ात ६०० ते ७००, औरंगाबादेत १६० सदस्य असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. लघु उद्योगांना वीज वाहिनी जोडण्याच्या कामात अडचणी येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या वेळी रवींद्र वैद्य यांची केंद्राच्या लघु उद्योगांशी संबंधित समितीवर निवड झाल्याचीही माहितीही देण्यात आली. पत्रकार बैठकीस अशोक राठी, उदय गिरधारी, संतोष कुलकर्णी, दुष्यंत आठवले, अविनाश देशपांडे, सुहास देशपांडे, अभय देशमुख, मिलिंद पोहनेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.