सर्वदूर पाऊस झाल्यानंतर सुप्तावस्थेतील शंखी गोगलगायी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच फळबागांचेही नुकसान होण्याची भीती असते. विशेषतः कोवळ्या रोपांच्या व पानांच्या अवस्थेत या गोगलगायींचा प्रादुर्भाव अधिक घातक ठरत असल्याने शेतकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले आहे.
शंखी गोगलगायी प्रामुख्याने रात्री अथवा पहाटे सक्रिय असतात. दिवसा त्या दगडाखाली, तणामध्ये, पिकांच्या अवशेषांमध्ये किंवा इतर ओलसर व सावलीच्या ठिकाणी आश्रय घेतात. सतत ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचून राहिल्यास त्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. प्रादुर्भाव झालेल्या शेतात कोवळी पाने कुरतडलेली दिसतात, नव्याने उगवलेली रोपे रात्रीच्या वेळी खाल्ली जातात, पानांवर व जमिनीवर चिकट श्लेष्माचा चमकदार माग दिसून येतो तसेच गोगलगायी व त्यांची अंडी मोठ्या प्रमाणात आढळतात.
गोगलगायींचे नियंत्रण करण्यासाठी सायंकाळी अथवा सूर्योदयापूर्वी त्या हाताने गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. तसेच शेतात गवताचे ढीग, ओले गोणपाट किंवा भाजीपाल्याचे अवशेष ठेवून सापळे तयार करावेत. सूर्योदयानंतर त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी आणि अंडी गोळा करून नष्ट करावीत. शेतातील तण, दगड, कचरा व पिकांचे अवशेष नियमित साफ ठेवावेत.
शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी पपई किंवा कोबीच्या पानांचा वापर करून आमिष तयार करता येते. तसेच आवश्यकतेनुसार शिफारशीनुसार मेटाल्डिहाईडयुक्त गोगलगायनाशकाचा वापर करावा, असे मार्गदर्शन कृषी विद्यापीठाच्या डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. जी. डी. गडदे एम. बी. मांडगे यांनी केले आहे.
पावसानंतर सलग तीन ते पाच दिवस सकाळी व सायंकाळी शेताची नियमित पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव लक्षात आल्यास कमी खर्चात आणि प्रभावी नियंत्रण मिळविता येते. एका शेतात उपाययोजना करून अपेक्षित यश मिळत नसल्याने गाव किंवा परिसरातील सर्व शेतकर्यांनी एकाच वेळी सामूहिकरीत्या उपाययोजना कराव्यात, असेही कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
