छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होताच बिळात राहणारे साप, गोम, विंचू आदी प्राणी बाहेर येऊन दंश करण्याच्या घटना पुढे येत असून, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील पंधरा दिवसांमध्ये २७ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे, तर बीड येथील जिल्हा रुग्णालयात मागील ४८ तासांत १३ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाचे आगमन जवळपास सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात झाले आहे. शेतीतील पेरणीच्या कामांनीही वेग घेतला आहे. पाऊस पडताच भूगर्भातून आणि शेत-शिवार परिसरातील वारुळे, बिळांमधून साप, विंचू, गोम आदी प्राणी बाहेर पडू लागतात. मानवाला या प्राण्यांकडून दंश होण्याच्याही घटनाही समोर येतात.
बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्पदंशाच्या मागील ४८ तासांतच १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील असून, शेतामध्ये काम करणाऱ्या कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. उल्हास गंडाळ यांनी सर्पदंशाच्या घटनांबाबत सांगितले, की महाराष्ट्रात प्रामुख्याने चार प्रकारचे विषारी साप आढळतात; परंतु आपल्याला चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी याची खातरजमा नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तेथील डॉक्टरांकडून करवून घेणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंश झाल्यास आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना आणि सर्पदंशावरील प्रतिबंधक औषधे उपलब्ध आहेत.
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सापांना अधिवासासाठी आवश्यक असलेले वातावरण पूरक असते. त्यामुळे सर्पदंश झाल्यास अथवा एखादा विषारी प्राणी चावल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे. – डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी
घाटीमध्ये २७ रुग्ण
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १५ ते ३० जून या कालावधीत सर्पदंश झालेले २७ रुग्ण दाखल झाले होते. त्या सर्वांवर उपचार करण्यात आलेले आहेत. सर्पदंशाच्या उपचारावरील सर्व औषधे घाटीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती अपघात विभागातून व घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.
