छत्रपती संभाजीनगर : पाणलोट, एकल महिला, निराधार मुले यांच्यासाठी आयुष्यभर सचोटीने प्रसंगी संघर्ष करत समाजवादी विचारसरणीने निरलस आयुष्य जगणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

धाराशिव जिल्ह्यात भूकंपग्रस्त भागातील मुलांसाठी बांधलेल्या ‘आपलं घर’ या संस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका संथ लयीत पण स्पष्ट शब्दातून व्यक्त होणारे विचार, नेहरू शर्ट, पायजमा, गळ्यात शबनम असा पोशाख. जवळच्या पिशवीत काही पुस्तिका, काही पत्रके आणि स्वत:च्या वाचनाचे एखादे पुस्तक. कोणत्याही विषयावर सर्व नव्या तपशिलांसह विश्लेषण करण्याची हातोटी. अगदी विरोधकांच्याही चांगल्या गुणांना हेरण्याची वृत्ती, या साऱ्या गुणांचा संगम असणारे सुराणा हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते.

समाजवादी राजकारण पुढे जावे यासाठी आयुष्यभर झटणारे सुराणा हे ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक होते. आणीबाणीमध्ये भूमिगत असणाऱ्या सुराणा यांना अटक झाली होती. केवळ आणीबाणीच नाही तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी निगडित अनेक आंदोलनांत त्यांना अटक झाली होती. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी त्यांची ओळख ही ‘भाऊ’ या नावानेच. त्यांच्या समवेत अनेक वर्षं काम करणारे विलास वकील म्हणाले, ‘भाऊं’चे जाणे म्हणजे अनेक अर्थाची पोकळी आहे. राजकीय व्यवस्था कशी असावी, येथपासून ते निराधार, वंचितांच्या आयुष्यात सर्व अर्थाने भर पडावी म्हणून ते सतत झटत राहिले. अनेक वर्षे त्यांची फिरस्ती फक्त राज्य परिवहन मंडळाच्या बसनेच व्हायची. १९९३ साली भूकंपानंतर अनाथ आणि निराधार मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘आपलं घर’ या संस्थात्मक कामात त्यांचे उत्तर आयुष्य गेले. लेखन, वाचन हे त्यांचे छंद होतेच पण माणसांत राहणे, त्यांच्या उन्नतीसाठी काम करणे हे त्यांचे ध्येय होते.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करताना ‘महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याचे म्हटले आहे.