छत्रपती संभाजीनगर – भरधाव कार टायर फुटल्याने एका हॉटेलमध्ये शिरली. या भीषण अपघातात हॉटेलमध्ये चहा पीत बसलेले दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील जकेकूर चौरस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार देवदर्शन करून हैदराबादच्या दिशेने भरधाव निघालेली कार टायर फूटून रस्त्याच्या लगत असलेल्या चहाच्या टपरीत घुसली. या संदर्भाने प्राप्त माहितीनुसार, जकेकूर चौरस्ता येथील उड्डाण पूलाजवळ राष्ट्रीय महामार्गालगत एका लिंबाच्या झाडाखाली जकेकूर येथील महादेव देडे (वय ३२) यांची पत्र्याच्या शेडची चहाची टपरी आहे.

अनेक वर्षांपासून देडे हे या पत्र्याच्या शेडमध्ये चहाचा व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी बळीराम कुशाप्पा पवार (वय ४८, रा उमरगा, लाडनशा गुलाबशा मुर्शद (वय ५२) व सचिन भिमाशंकर कुटार (वय ३०) हे तिघे चहा पित बसलेले होते. या दरम्यान सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारचे (टिएस ३४ एफ ४७०६) समोरचे उजव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली कार थेट महादेव देडे यांच्या चहाच्या टपरीत घुसली.

या भीषण अपघातात चहा पित बसलेले बळीराम पवार, लाडनशा मुर्शद हे दोघे जागीच ठार झाले, तर सचिन कुटार गंभीर जखमी झाले असून टपरीचालक महादेव देडे हे  जखमी झाले आहेत. या अपघात दोन ते तीन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेतील जखमींना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी बळीराम पवार, लाडनशा मुर्शद यांना मृत घोषित केले.