औरंगाबादेत रेल्वे रुळावर आढळला लष्करी जवानाचा मृतदेह

अपघात की आत्महत्या अस्पष्ट

जितेंद्र वाकळे

औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशनच्या रेल्वेरुळावर भारतीय लष्करातील जवानाचा मृत्यदेह आढळला आहे. जितेंद्र मारुती वाकळे असे या ३५ वर्षीय जवानाचे नाव आहे. उपचारासाठी ते कामातून रजा घेऊन गावी आले होते. रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. जितेंद्र वाकळे हे गंगापूर तालुक्यातील लासुर या गावचे होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच्या बाजूलाच त्यांच्या नातेवाईकांची शेती आहे. तिकडून येत असताना हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. बऱ्याच दिवसांपासून जितेंद्र वाकळे वैद्यकीय रजेवर होते. काल रात्री १० वाजता घरातून कोणालाही काही न सांगता ते बाहेर गेले. अजंता एक्स्प्रेससमोर वाकळे यांचा अपघात झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वाकळे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील तीन बहीण एक भाऊ असा परिवार आहे. पंढरपूरच्या वारीत दर्शन करून ते शुक्रवारी घरी परतले होते. त्यानंतर ही घटना घडली. नेमका हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Soldier dead body found in railway truck in aurngabad