छत्रपती संभाजीनगर : संसदेच्या छायाचित्रावर ठसठशीत अक्षरात ‘ श्रद्धांजली ’ असा शब्दप्रयोग असो किंवा ‘ सायमन गो बॅक ’ प्रमाणे ‘ बीजेपी गो बॅकचे ’ नारे असो ,छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी सोनम वांगचूक यांची छायाचित्रे घेऊन तरुण रस्त्यावर उतरले. पण ‘ नीट ’ पेपरफुटीचे केंद्र असणाऱ्या लातूरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये म्हणावा तसा जोर नव्हता. काही क्षीण आवाजातील घोषणा लातूरमध्ये दिल्या गेल्या. तुलनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयातील तरुणांनी आंदोलनातील उर्जा वाढविणारे अनेक फलक झळकावत ‘ इनक्लाब जिंदाबाद’ नारा बुलंद केला.
सकाळी ११ वाजल्यापासून शहरातील क्रांती चौकात तरुणांनी गर्दी करायला सुरुवात केली. तरुण विद्यार्थांच्या या आंदोलनातील फलक राजकीय भाष्य करणारे होते. एका बाजुला अदानी आणि दुसऱ्या बाजूला अंबानी पंतप्रधानाच्या कानात काही तरी सांगत असल्याचे चित्र घेऊन विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘ लढेंगे – जितेंगे ’, ‘ दादागिरी नही चलेगी, ‘ शिक्षण आमच्या हक्काचं ’ अशा अनेक घोषणा आंदोलन स्थळी देण्यात येत होत्या. अगदी लहान मुलांच्या हातात फलक देऊन काही पालकही या आंदोलनात सहभागी झाल्याने क्रांती चौकात तरुणांचा मोठा जल्लोष सोमवारी पहावयास मिळाला. यातील काही वादग्रस्त फलक पोलिसांनी आंदोलकांकडून काढून घेण्यात आले.
कोणी गणवेश घालून तर कोणी शर्टच्या समोर सोमन वांगचूक यांचे मोठे छायाचित्र असणारा फलक चिकटवून आंदोलनात सहभागी झाले होते. सरकार विरोधाच्या घोषणा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. दुसरीकडे शहरातील शहागंज परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहरातील समाजवादी व पुरागामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोनम वांगचूक व अभजीत दिपके यांच्या आंदोलनातील मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन केले.
लातूरमध्ये सीबीआयचे पथक तळ ठोकून
तरुणांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यात विविध शहरात सोमवारी आंदोलन करण्यात आले यात अनेक पालकही सहभागी झाले होते. मात्र, लातूरमधील आंदोलनात म्हणावा तसा जोर नव्हता. दुसरीकडे अजूनही ‘ नीट ’ पेपरफुटीचा तपास करणारे अधिकारी लातूरमध्ये तळ ठोकून आहेत. शिवराज मोटेगावकरांचे व्यवहार तपासणीचे काम सध्या जोमात असून त्याच्या बँक खात्यातून कोणाशी व्यवहार झाले, ते कोणत्या कारणासाठी होते, याचा तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभर ‘ नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे आंदोलन सुरू असताना लातूरमध्ये त्याचे आवाज कमालीचे क्षीण होते. या उलट अन्य शहरातून सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
