परभणी: कायदेशीर उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा संपादित केल्याबद्दल सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार तथा ठाणे महानगरपालिकेतील संजय गांधी योजनेत कार्यरत तहसीलदार आशिषकुमार बापुराव बिरादार व त्यांच्या पत्नी अपर्णा बिरादार यांच्याविरूद्ध नानलपेठ पोलिसांत मंगळवारी (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील एका ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पथकाने सोनपेठ येथे सापळा रचून तहसीलदार बिरादार यांच्या विरोधात कारवाई केली. आरोपी बिरादार यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता संपादित केल्याने तत्कालीन चौकशी अधिकारी यांनी आरोपीच्या मालमत्तेची चौकशी करून अहवाल सादर केला.

त्याप्रमाणे ३ नोव्हेंबर २००७ ते ३ ऑगस्ट २०२१ या परीक्षण कालावधीत आरोपीने ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा ८७ लाख ८४ हजार २२८ रुपये म्हणजेच उत्पन्नाच्या ८१.९१ टक्के एवढी अपसंपदा संपादित केली. या याकामी आरोपीच्या पत्नी अपर्णा बिरादार यांनी प्रोत्साहन दिल्याचे तवासात निष्पन्न झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक किशोर तोरोणे यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भारतीय दंड संहिता कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.