नांदेड : शहरातील श्रीनगर भागात सोमवारी (दि.०६ एप्रिल) रोजी घडलेल्या सोनू कल्याणकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना चौथे न्यायदंडाधिकारी के.बी.सोनवणे यांनी १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
नांदेड शहराच्या श्रीनगर भागातील जुन्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर सोमवारी सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकर (वय ३५) याचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला होता. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी त्याचे वडील अशोक कल्याणकर यांच्या तक्रारीवरून आरोपी चंद्रविजय मंगनाळे, कारागृहात असलेला मुक्तेश्वर ऊर्फ गोलू मंगनाळे, रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंदनवाड, मधू जोगदंड या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील अंकुश गंदनवाड यास पोलिसांनी पायावर गोळी मारून पकडले होते. त्याच्यावर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
हत्या प्रकरणातील आरोपी चंद्रविजय मंगनाळे, रोहित लोट, पियुष शिंदे, मधू जोगदंड या चौघांना नांदेडच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती सोनवणे यांनी तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी पाठवले आहे. तर मंगनाळे यास वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
