नांदेड: सोनू कल्याणकर खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, कल्याणकर कुटुंबीयांस पोलीस संरक्षण द्यावे, खून प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्या शुक्रवारी लिंगायत समाजाच्या बैठकीत मांडण्यात आल्या. आक्रमक झालेल्या लिंगायत समाजाने पोलीस उपमहानिरीक्षक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
शहरातील श्रीनगर भागात शनिवारी सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचा भररस्त्यात चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी मारहाण करत खून केला. या घटनेची लिंगायत समाजाने नोंद घेत शुक्रवारी एका हॉटेलमध्ये बैठक घेत घटनेचा निषेध केला. ही बैठक लिंगायत समाजाचे नेते प्रा.मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत लिंगायत समाज बांधवांनी आपली मते नोंदवली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, गंभीर गुन्ह्याचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा यासह अन्य मागण्या लाऊन धरण्यात आल्या. प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास लिंगायत समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीला रामदास पाटील सुमठाणकर, अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, संजय बेळगे, गंगाधर बडूरे यांच्यासह लिंगायत समाजातील कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.
