छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक भागावर पेरणी झाली आहे. या वर्षी छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेडसह कापूस क्षेत्रात घट झाली असून, काही ठिकाणी मका पीक वाढेल, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. काही भागात पाऊस कमी असल्याने शेतकरी हैराण आहेत. विशेषत: कंधार, मुखेड, मुदखेड या तालुक्यांत पाऊस तुलनेने कमी असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील काही भागातही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. कापसाच्या बदलत जाणाऱ्या भावामुळे मका पीक अधिक उपयोगी ठरत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका पीक घेतले जात आहे, तर बीडमध्ये राजमा हे पीक घेतले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्रापैकी ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली, तर हिंगाेली आणि लातूर विभागात ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रापैकी ७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मे महिन्यातील मोठ्या पावसाने धरणांतील पाणीसाठा वाढला. मराठवाड्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. ‘जायकवाडी’त ४७.९६ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. मराठवाड्यात गणपतीनंतर मोठा पाऊस होतो. त्यामुळे दिवाळीनंतर धरणातील पाणीसाठा वाढतो. गेल्या वर्षी जुलैमध्ये १३.३४ टक्के एवढाच पाणीसाठा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश परिसरात खरिपाची पेरणी आटोक्यात आली असली, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. आतापर्यंत ३२.२१ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले. व्यापारी बँकांनी मात्र यामध्ये हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.