छत्रपती संभाजीनगर : पाच रुपयात २० लिटर पिण्याच्या पाण्याचे जार, ग्राम पंचायतीचा कर भरणाऱ्यास वर्षभर मोफत दळण, मुलांसाठी शाळेत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र सोय, याशिवाय गावातील ३२ बचत गटाचे अनेक व्यावसाय. त्यात तेलाचा घाणा, दूध डेअरी, शिलाई मशीन, डाळ पॉलिश करण्याचा व्यावसाय स्वतंत्र. ग्रामपंचायतीच्या मालकीचे गांडुळ शेतीतून मिळणारे खत असे अनेक उपक्रम एकाच गावात. गावाचे नाव जरांडी. तालुका सोयागाव. हे सारे घडवून आणणाऱ्या गावकऱ्यांबरोबर समन्वयाचा व्यक्ती ग्रामसेवक म्हणजे सुनील मंगरुळे.

एखादा चांगला अधिकारी आणि गावकरी यांनी मिळून काही आदर्श घडविण्याचे ठरवले तर काय होऊ शकते, हे पहायचे असेल तर जरांडी गाव पहावे. शासनाच्या सर्व याेजना आणि गावकऱ्यांची निकड याची जोड या गावात पहावयास मिळते. केवळ भौतिक सुविधा नाही तर पर्यावरण प्रेम वाढवत सुनील मंगरुळे यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. अगदी स्मशानभूमीमध्येही ती हिरवळ कायम ठेवण्यात त्यांना यश आले. मुलगी मोठी झाली की तिच्या सुरक्षेचे प्रश्न ग्रामीण भागात चर्चेत असतात. त्यामुळे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर गावातील प्रमूख रस्त्यावरही सीसीटीव्ही आहेत.

शाळांमध्ये आता अभ्यासक्रमासाठी तंत्रज्ञान प्रयोगशाळा करण्यात आली आहे. या गावातील उपक्रमाबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेवराव सोळंके म्हणाले, ‘ एखाद्या गावात विकासाचे एवढे उपक्रम होतात आणि ग्रामसेवक त्यात पुढाकार घेतात, हे चित्र कोणालाही अभिमान वाटावा असेच आहे. या गावात केवळ भौतिक सुविधाच नाही तर पर्यावरण राखण्याचे कामही चांगले झाले आहे.’

गाव सुधारणेसाठी झटणारे सुनील मंगरुळे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षात हे गाव सुधारुन दाखवायचे असे आम्ही ठरवले होते. गावात बहुसंख्येने आदीवासी आहेत. सोयगाव तालुक्यात हे गाव तसे आडवळणी आहे. शहरापासून दूर असल्याने विकासाची आस गावात होती. त्याला आकार दिला आणि आता गाव चांगले सुधारले आहे. गावातील महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगामुळे उलाढालही वाढली आहे. ’

ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढावे म्हणून प्लास्टिक गोळा केले जाते. जो कोणी प्लास्टीक ग्रामपंचायतीमध्ये विकेल त्याला रक्कम दिली जाते. ते सर्व प्लास्टीक पुन्हा शहरात विक्री करण्याचा व्यावसायही ग्रामपंयाचतीकडून केला जातो. गावात सावलीची ठिकाणे खूप. खूप ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत शेवगा आणि अंबा ही झाडे लावली आहेत. त्यातून ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळत राहते.