नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरणांनी घेतलेल्या निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीच्या शैक्षणिक आंकेक्षण तपासणी (एएए)मध्ये ज्या महाविद्यालयांची दर्जामध्ये घसरण दिसून आली त्या २९ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात राजकीय क्षेत्रांतील दिग्गजांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष जूनच्या दुसर्‍या आठवड्यानंतर सुरू होत असून तत्पूर्वी विद्यापीठाने वरील कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संबंधितांत, विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थाचालकांत खळबळ उडाली. या निर्णयाची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी जाहीर केली. तत्पूर्वी २७ मे रोजी विद्यापीठ प्रशासनाने या संबंधीचे एक परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आंकेक्षण तपासणीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण व ‘फ’ दर्जा मिळाला, अशा महाविद्यालयांतील पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

प्रवेश देण्यास मनाई घातलेल्या संबंधित महाविद्यालयांनी २०२६-२७ शैक्षणिक वर्षात पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश देऊन जे विद्यार्थ्यांचे नुकसान करतील त्यास संंबंधित महाविद्यालयाचे प्रशासन जबाबदार राहील, असेही संबंधितांना बजावण्यात आले आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या शैक्षणिक आंकेक्षण तपासणीतील ७२ महाविद्यालयांपैकी ५ महाविद्यालयांना ‘ओ’ तर ११ महाविद्यालयांना ‘अ’ दर्जा मिळाला. सर्वात खालच्या ‘एफ’ श्रेणीमध्ये २९ महाविद्यालये दिसून आली. या २९ महाविद्यालयांत सर्वाधिक महाविद्यालये नांदेड जिल्ह्यातील (१८), लातूर जिल्ह्यातील (७) तर परभणी जिल्ह्यातील (४) महाविद्यालयांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ.चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील यांनी दिलेल्या अहवालानंतर विद्या परिषदेच्या ठरावानुसार वरील निर्णय घेण्यात आला.

कारवाई पात्र महाविद्यालयांमध्ये खा.रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेषराव चव्हाण, नानासाहेब जाधव या दिग्गजांसह काही नवीन शिक्षणसम्राटांच्या संस्थांचाही समावेश आहे. अशा सर्व महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘अ‍ॅफिलेशन’ या शीर्षकाखाली जाहीर केल्याचे उपकुलसचिवांनी कळविले आहे.

निर्णय व कारवाईत विसंगती

विद्यापीठाच्या परिपत्रकात ‘हे परिपत्रक केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयासाठी लागू आहे. व्यावसायिक महाविद्यालये जसे की, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण इत्यादी महाविद्यालयांस लागू नाही.’ असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले; परंतु विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने ‘एफ’ ग्रेड श्रेणीतील सर्वच महाविद्यालयांची नावे जाहीर केल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थाचालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. हे परिपत्रक आम्हाला लागू होऊ शकत नाही, असे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाचे संचालक मुकेश पाटील टाकळीकर यांनी नमूद केले आहे.