औरंगाबाद : मराठवाडय़ात या वर्षीचा गाळप हंगाम विक्रमी असून आतापर्यंत अतिरिक्त उसाचे प्रमाण अधिक असणाऱ्या जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४४ लाख २ हजार २५६ टन गाळप झाले. अजूनही या तीन जिल्ह्यांतील १६ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सहा लाख ५२ हजार ४७७ हेक्टर ऊस शिल्लक आहे. सध्या ऊसतोडणी मजुराची समस्या असल्याने या तीन जिल्ह्यांत ५२ हार्वेस्टरच्या साहाय्याने तोडणी सुरू आहे. अगदी दररोज तोडणी होणारा ऊस आणि होणारे गाळप यावर नियंत्रण ठेवले जात असून पाऊस नाही आला तर गाळप संपेल. पण पाऊस अलिकडे सरकला तर अडचणींमध्ये वाढ होईल असे सांगण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत समर्थ सहकारी साखर कारखान्यात आठ लाख १० हजार ६०० टन उसाचे गाळप झाले असून सागर साखर कारखान्यात पाच लाख १७ हजार २९० टन उसाचे गाळप झाले आहे. अद्यापि दोन लाख सहा हजार ७६३ टन गाळप होणे बाकी आहे. या दोन्ही कारखान्यांना मदत करण्यासाठी बारामती अ‍ॅग्रोसह जवळपास १६ साखर कारखाने प्रयत्न करीत असून ऊस गाळप पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. दरम्यान, या वर्षीचे गाळप सर्वाधिक असून सहा लाख ऊस गाळप होणे बाकी आहे. काही नोंदणी न झालेल्या उसाचे प्रश्न मात्र कायम आहेत. बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर ऊस प्रश्नाची दाहकता अधिक वाढली. मात्र, या वर्षी ऊसतोडणी मजुराने अधिक पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट केली. अशा ४५ तक्रारींवर कारवाई केली जाणार असून अधिकची रक्कम वाहतूक देयकातून वसूल केली जाईल व शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे.

अवकाळी पाऊस किंवा मान्सून सरी वेळेपूर्वी दाखल झाल्या आणि तोडणी केलेला ऊस फसला तरच अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होईल असे सांगण्यात येत आहे. या वर्षीचे आतापर्यंतचे गाळप हे गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक गाळप असल्याची आकडेवारी उपलब्ध होत आहे. पूर्वी मराठवाडय़ातील सिंचन व्यवस्था असणाऱ्या भूभागापैकी २७ टक्के भागावर ऊस होता. या वर्षी त्यात ४४ टक्क्यांची वाढ झाली. या वर्षी मराठवाडय़ातील ५४ कारखान्यांचे गाळप विक्रमी वाढले. २०१०-११ पर्यंत ९४ हजार ५६० प्रतिदिन गाळपक्षमता आता एक ५७ हजारपेक्षा अधिक झाली होती. त्यावरही आता मात करण्यात आली आहे. अधिक दिवसाचे गाळप लक्षात घेता या वर्षी सर्वाधिक साखर, इथेनॉल उत्पादन होणार आहे.