छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांमध्ये ७३ अंक केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ११ कलमी योजनांची घोषणा केली. ७३ हजार बांधकाम मजुरांना सुरक्षा संच, तेवढीच शेततळी, सौर उर्जेचीही गावे, ७३ गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकामापासून ते तीर्थस्थळे आणि गडकिल्ल्यांचा विकास करण्याची घोषणा पत्रकार बैठकीत केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
शासकीय योजनांची गाठ ७३ आकडय़ाभोवती व्हावी, अशाप्रकारे योजना जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचे लाभ देण्यात येतील, असे जाहीर केले. जाहीर केलेल्या सर्व योजनांमागे ‘नमो’ ही अक्षरे लावत योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले. राज्यात ‘नमो आदिवासी स्मार्ट शाळा’, दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार’, नमो क्रीडा मैदाने व उद्याने उभारली जातील, असे सांगण्यात आले. शिवाय ७३ शहरांमध्ये सौंदर्यीकरणाचे प्रकल्प राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी ‘सबका साथ सबका विकास’ कार्यक्रम हाती घेत देशाचे नाव उंचावले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यात येणार आहे.




- २० लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत पाच लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, उद्योग उभारणीसाठी भांडवल आणि तीन लाख महिलांना उद्योजिका बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करून दिले जाणार आहे.