औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही, तर परिसरात हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली असून शहरातील ४० ते ४५ मंदिर व मशिदी जवळ-जवळ असलेल्या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात एक हजार ४८ मंदिरांची संख्या आहे, तर ४२० पर्यंत मशिदींची संख्या असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेकडून देण्यात आली. यातील ४० ते ४५ ठिकाणी मंदिर आणि मशिदी जवळ-जवळ आहेत. अशा संमिश्र लोकवस्तीच्या ठिकाणी गस्त घालून बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे.
बंदोबस्ताची काही ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत.या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा पठण केले जाण्याची शक्यता ओळखून बंदोबस्त लावण्यात आलेला असून मनसैनिकांना नोटिसही बजावण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) बालाजी सोनटक्के यांनी दिली.
पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचनेप्रमाणे १४९ अनुसार दीडशेंवर कार्यकर्त्यांना नोटिस बजावण्यात आलेली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत १० च्या आसपास कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत. – बालाजी सोनटक्के, सहायक पोलीस आयुक्त.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांना १४९ ची नोटिस देण्यात आली आहे. सकाळपासूनच सर्व पदाधिकाऱ्यांना स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये बोलावले जात होते. जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या घराच्या खाली सकाळपासूनच पोलीस होते. नंतर उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी त्यांना नोटिस बजावली. तर राज ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोबतच सतनाम सिंग गुलाटी, वैभव मिटकर, दिलीप बनकर, बिपीन नाईक, गजगौडा पाटील, आशिष सुरडकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, संकेत शेटे यांच्यासहित महत्त्वाच्या इतर पदाधिकाऱ्यांना नोटिस बजावण्यात आली आहे.