उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती

औरंगाबाद : मराठवाडय़ात उद्योगांना चालना मिळावी, यासाठी ‘डीएमआयसी’सारखा मोठा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे. १० हजार एकरावर नवी औद्योगिक वसाहत उभी राहावी, असे प्रयत्न सुरू असल्याने मराठवाडा हे उद्योगाचे मोठे केंद्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील उद्योजकतेला अधिक झळाळी मिळावी आणि लघुउद्योजकांच्या समस्या शासनदरबारी पोहोचाव्यात यासाठी ‘लोकसत्ता’ने गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता कलाग्राम येथे लघुउद्योजकांसाठी चर्चासत्र आयोजित केले आहे.

एनकेजीएसबी को-ऑप. बँक प्रस्तुत व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित चर्चासत्रास उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमास मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड असोसिएशन (मसिआ) या औद्योगिक   संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या चर्चासत्रात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन हे मार्गदर्शन करतील. औरंगाबाद येथे होणाऱ्या या परिषदेस मुंबई शेअर बाजारचे मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठ मार्गदर्शन करणार आहेत. मसिआ संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे हे औरंगाबादसह मराठवाडय़ातील लघु व मध्यम उद्योगांची शक्तिस्थळे आणि समस्यांबाबतचा ऊहापोह या चर्चासत्रात करतील. यानंतर विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योगमंत्री यांच्यात चर्चाही होणार आहे. मराठवाडय़ातील उद्योजकतेबाबतच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत या वेळी चर्चा होणार आहे.

उद्देश : महाराष्ट्राची औद्योगिकता वाढती राहावी, त्यात लघु आणि मध्यम उद्योजकांना अधिक स्थान असावे, या हेतूने राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘लोकसत्ता’च्या वतीने असे चर्चासत्र आयोजित केले जाते. उद्योग मंत्रालय आणि उद्योजक यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ म्हणून अशा चर्चासत्रांचा उपयोग होत असल्याचा अनुभव औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांना येत आहे.