छत्रपती संभाजीनगर : साखर कारखान्यांचा प्रति टन गाळपानंतरचा सरासरी तोटा ७०० रुपयांपर्यंत जात असल्याने मदतीसाठी राज्यातील साखर कारखांनदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्र्याची भेट घेण्याची तयारी करत आहेत. या अनुषंगाने नुकतीच एक बैठक सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. विशेष म्हणजे या तोट्यात साखरेचा विक्री दराबरोबरच इथेनॉल उत्पादन आणि दर या प्रश्नही गंभीर बनले असल्याचे सांगण्यात येते. राज्याची इथेनॉल उत्पादनाची क्षमता ३४५ .७६ लाख कोटी लिटर एवढी आहे. मात्र, या वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने केवळ १०० लाख लिटर दिली असल्याने इथेनॉल मधून मिळणारा नफाही आता पदरी पडणार नाही, असा दावा साखर कारखांनदार करू लागले आहेत.
साखर कारखान्यातून वाढत जाणारा तोटा लक्षात घेता त्यावर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर ही मंडळी या बैठकीस होती. या बैठकीमध्ये साखरेचा सध्या ३६ रुपये असणारा दर वाढवावा अशी मागणी केली जात आहे. या अनुषंगाने बोलताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, ‘गेल्या काही दिवसात सरासरी ११० दिवसापेक्षाही कमी दिवस कारखाने चालतात. एफआरपी आणि साखरेचे दर यातील तफावत वाढत आहे. परिणामी तोटा वाढतो आहे. अगदी इथेनॉलसारख्या उत्पादनातून नफाही मिळणे अवघड झाले आहे. इथेनॉलचे तीन प्रकारचे दर आहेत. उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन असल्यास ६५ रुपये ६१, बी- हेवी व सी – हेव्ही मळीपासून इथेनॉल केल्यास हा दर अनुक्रमे ६०. ७३, ५७.९७ असा आहे. तुलनेने मक्यापासून इथेनॉल निर्मितीचा दर ७१. ८६ रुपये एवढे आहेत. गेल्या दोन वर्षापासून यात बदल झालेले नाहीत. आता क्षमतेपेक्षा कमी उत्पादन केल्यामुळे होणारे नुकसानही अधिक आहे.’
गेल्या काही दिवसात साखर व्यावसायात येणारी तूट लक्षात घेता त्यावर केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने काही निर्णय घेण्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असून पुढे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना प्रश्न सोडविण्याची विनंती करण्याचे ठरविण्यात आले आहे. तत्पूर्वी एक टन उस गाळपानंतर येणारा तोटा किती रुपयांचा याची आकडेवारी गोळा केली जात आहे. आता या तोट्यात इथेनॉलचाही वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात १५६ आसवानी प्रकल्प असून त्यातील ७९ प्रकल्प सहकारी साखर कारखान्यांमध्ये तर ५४ प्रकल्प खासगी साखर कारखान्यातील आहेत. केवळ आसावनी प्रकल्पाची संख्या २३ आहे. ३० जानेवारीच्या आकडेवारी ६३.४ कोटी लिटर्स इथेनॉल पुरवठ्यास प रवानगी देण्यात आली होती. त्यातील ४३. ६८ कोटी लिटर्स इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी पुरवण्यात आले आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या मानाने ना साखर कारखाने चालत आहेत ना, इथेनॉल प्रकल्प परिणामी साखर व्यावसायाचा तोटा वाढत असल्याची मत व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
वेस्टर्न इंडया शुगर मिल्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, ‘ गेल्या वर्षीपासून मिळालेले नियतन क्षमतेच्या केवळ ३२ टक्के एवढेच आहे. उलट धान्यापासून इथेनॉलकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. खरे गेल्या ३० वर्षात मोठी क्षमताबांधणी केली. पुढील दहा वर्षात किती इथेनॉल देणार याबाबतचे हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आता मागणीच घटवल्याने तोटा वाढतो आहे. साखरेचे विक्री दर ३१ रुपयेच ठेवले आहेत. जेव्हा हा ठरला तेव्हा उसाचा दर २७५० रुपये होता. आता तो ३५५० एवढा झाला आहे. त्यामुळे तोटा वाढतो आहे.’

