छत्रपती संभाजीनगर : साखरच्या दरात झालेली वाढ आणि चुकलेले धोरण यावरुन चर्चा सुरू असताना आता आपण साखर कशी वापरतो यांची आकडेवारी समोर आली आहे. साखरेचा प्रत्यक्षातील वापर आणि औद्योगिक वापर यात मोठी तफावत दिसून येते. सणासुदीला सर्वसामांन्य व्यक्तीला साखर लागते, अशी धारणा आयातीपूर्वी निर्माण केली जाते. प्रत्यक्षात साखरेचा उपयोग चॉकलेट, बिस्किट, औषधे, आईसक्रिम, बेकरी तसेच शीतपेयांमध्ये वापरली जाते. चहा – कॉफी आणि मिठाईमध्ये वापराचे हे प्रमाण एकूण उत्पादीत साखरेच्या तुलनेत अधिक नाही, असे साखर उत्पादक सांगतात. मुळात साखर उत्पादनाचे अंदाज न घेता, धोरणात्मक पातळीवर चुकीचे निणर्य घेतल्याने साखर आयातीची वेळ आल्याची टीका साखर वापराच्या वापरावरुन पुढे येत आहे.

साखरेचे उत्पादन २८५ लाख मेट्रीक टन झाल्यानंतर दरवर्षी लागणाऱ्या साखरेच्या मागणीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. साखर वापरातील सर्वाधिक हिस्सा उद्योगांमध्ये वापरला जातो. हॉटेल, रेस्टॉरटमध्ये चहा – कॉफीमध्ये १९ ते २० टक्के साखर वापरली जाते. तसेच शीतपेय किंवा अल्कहोलशिवाय तयार होणाऱ्या सर्व पेय तयार करताना लागणारा हिस्सा १८ ते २० टक्क्यांचा आहे. चॉकलेट आणि कॅन्डीज् बनविण्यासाठी १७ ते १९ टक्के साखर वापरली जाते. बेकरी आणि बिस्कीट या क्षेत्रातील उद्योग १४ ते १६ टक्के साखर वापरतात. मिठाई तयार करण्यासाठी ९ ते ११ टक्के साखर वापरली जाते. तर औषधे, सॉस अशा उद्योगांमध्येही साखर वापराचे प्रमाण अधिक आहे.

साखर आयातीच्या धोरणांच्या आणि या सर्व उद्योगांचा संबंध आहे. त्यामुळे आयातीचा संबंध लावताना ‘ सर्वसामांन्य ’चा चेहरा आणि सणासुदीचे दिवस असे शब्द वापरले जात असले तरी साखरेचे प्रत्यक्ष लाभार्थी हे उद्योजक आहेत, असेही सांगण्यात येते. मुळत: साखरेच्या धोरणात आयात निर्यातीबाबत धरसोड धोरणांचा फटका आता साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर धोरणावरुन सरकारवर टीका होत आहे. मात्र, साखर वापराचा दैनंदिन कल उद्योग जगताशी निगडीत आहे. साखर महाग होत गेली तरी पुढच्या काळात चॉकलेट आणि बिस्किटाच्या किंमतीवरही होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

साखर उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणारे जयप्रकाश दांडेगावकर म्हणााले, ‘ केंद्राच्या साखर आयात निर्यातीच्या धरसोड धोरणांमुळे साखर आयात करण्याची वेळ आली आहे. काही दिवसापूर्वी साखर निर्यातीचे आदेश दिले होते. जर उत्पादनाचा अंदाज कमी होता तर साखर निर्यातीस परवानगी देण्याची गरजच नव्हती. पण साखर धंद्यातील सरकारच्या धरसोडवृत्तीमुळेच अडचणी वाढत आहेत.’

चॉकलेट, बिस्कीट या व्यावसायातील एकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले की, लगेच दर वाढणार नाहीत. मात्र, दररोज साखर वापरणाऱ्या चहा – कॉफी किंवा पेय विक्रेत्यांवर याचे परिणाम जाणवतील. पण तेही अजून असह्य या पातळीवरचे नाहीत.