scorecardresearch

प्रति हेक्टर उसाची उत्पादकता ३० टनाने वाढल्याचा दावा ; राज्यात ३५ लाख टन साखर उत्पादनात वाढ

वाढलेला ऊस व गाळपाची आकडेवारी लक्षात घेता १४१५ लाख टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज आहे.

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत आहे. बेण्यांच्या बदललेल्या जाती, अधिकचा पाऊस आणि उसातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे या पिकाची शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेतल्याने हेक्टरी उत्पादकता वाढल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या हंगामात ११.४२ लाख हेक्टरावर ऊस लागवड झाल्याची नोंद होती. त्यातील ९९७ लाख टन उसाचे गाळप करून १०७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. तेव्हा प्रति हेक्टर उसाचे उत्पादन ८५ टन एवढे होते. या हंगामात मात्र १२.३२ लाख हेक्टरावरील ऊस लागवडच्या नोंदी झाल्या. म्हणजे ०.९० लाख हेक्टरवर ऊस वाढला. वाढलेला ऊस व गाळपाची आकडेवारी लक्षात घेता १४१५ लाख टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. त्यातून साखरचे १३५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. खरे तर साखर कारखान्यांकडील नोंदीनुसार ९० हजार हेक्टरावरच ऊस अधिक लागवडीचा आहे. अधिक लागवड नाही तर उत्पादकता अधिक असल्याने राज्यातून तब्बल ३५ लाख टन साखर अतिरिक्त झाली. कर्नाटकातील साखरेची गणितेही अशीच चढी आहेत. पण ती वाढ सात लाख क्विंटल एवढीच आहे. तुलनेने झालेली वाढ ही वाढलेल्या उत्पादकतेची असल्याचे संगण्यात येत आहे. या अनुषंगाने खासगी साखर काखान्यांच्या संघटनेचे अध्यक्ष व नॅचरल शुगर या उद्योगाचे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले,की ऊस अधिक होताच, त्यात नोंदीचा घोळ होता, त्यामुळे साखर उत्पादन वाढले हे काही अंशी खरे असले तरी त्यात खरा वाटा हा ऊस उत्पादकतेचा आहे. या वर्षी प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले. उत्पादकतेचा आलेख चढता असल्याचे साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनीही मान्य केले. खरे तर ऊस नोंदी घेताना काही वेळा दोन कारखान्यांकडे नोंदी होतात. पण या वर्षी प्रति हेक्टरी उत्पादकताही वाढली आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sugar production in maharashtra increased by 35 lakh tones zws