छत्रपती संभाजीनगर – कामाचा माणूस कार्यतत्परतेचा झपाटा ठेवणारा नेता म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची ख्याती होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम सुरू ठेवणार असल्याचा संदेश दादांच्या पत्नी, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारच्या दौऱ्यात दिला.गुरुवारी दुपारनंतर बीडमध्ये आगमन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली. रात्री घड्याळाच्या काट्यात ११ वाजले तरी बैठक सुरुच होती. प्रशासनाशी विकासकामांच्या आढाव्याबाबत चर्चा, लोकप्रतिनिधींसोबत संवाद, नागरिकांच्या अडचणी सुनेत्रा पवार यांनी जाणून घेतल्या. रात्री १२ च्या सुमारास त्या मुक्कामाच्या स्थळी पोहोचल्या. अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटेच त्या बीडमधील पुरातन मंदिर आणि ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर मंदिरात आरतीसाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासमवेत माजीमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आणि विक्रम काळे उपस्थित होते.
सकाळी सात वाजता सुनेत्रा पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. रुग्णालयाची पाहणी करून काही रुग्णांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनही उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दाखल झाल्या असून, जिल्ह्यातील सर्व कामांच्या आढावा, पावसाची माहिती त्या घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता अनेकांच्या मनात गुरुवारपर्यंत होती. मात्र गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटेपासूनच त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला.
पुरातत्त्व विभागाशी चर्चा
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी कंकालेश्वर मंदिरास भेट देत भगवान महादेवाचे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली. यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कंकालेश्वर मंदिराच्या संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून विविध कामांचा आढावा घेतला. मंदिर परिसरात अजित पवारांनी मंजूर केलेल्या ९ कोटी १४ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.
व्यस्ततेतूनही प्रवास, बैठका
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या घरी २९ रोजी पुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा होता आणि सायंकाळपर्यंत चाललेल्या समारंभानंतरही त्या ३० रोजी रस्ते मार्गे प्रवास करत बीडमध्ये दाखल झाल्या. येथे येताच बैठका आणि त्याही रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच त्यांनीही कामाला सुरुवात केल्याने अजित दादांच्या कामाच्या झपाट्याच्या आठवणी जाग्या झाल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
