छत्रपती संभाजीनगर : धाराशिवचा जावाई आहे असा उल्लेख अजित पवार आवर्जून करत असत. आता अजित पवार यांच्या अपघाती निधनाने धाराशिवच्या लेकीवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही राज्याची मोठी जबाबदारीही आली आहे. धाराशिवमध्ये जन्मलेल्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवनमध्ये शिकलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

​सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक ‘तेर’ गावचा. बाजीराव पाटील यांच्या या कन्येला माहेरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. बाजीराव पाटील यांच्या तिसऱ्या पत्नी झालेल्या पाच मुलांपैकी सुनेत्रा पवार या एक. तेरचा पाटील हा मोठा परिवार. घरात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा राजकीय वारसा. ३० डिसेंबर १९८५ रोजी सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे राजकारणातील दोन मोठ्या घराण्यांचे मिलन होते. तत्कालीन मातब्बर नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी स्वतः हा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे ठेवला होता.

​सुनेत्रा पवार या बाजीराव पाटील यांच्या तिसऱ्या पत्नीच्या कन्या. दहा बहणी आणि तीन भाऊ असा हा परिवार. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या या धाकट्या बहिणीची नेहमीच पित्यासमान काळजी घेतली. आजही माहेरचा हा मोठा आधार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. डॉ. पद्मसिंह पाटील वार्धक्यामुळे थकलेले असले, तरी त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आपल्या आत्याला सावरण्यासाठी बारामतीमध्ये सोबत आहेत.

​बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय समज आणि शांत संयमी स्वभाव असल्याचे धाराशिवकर आवर्जून सांगतात.