छत्रपती संभाजीनगर – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आराेप असलेल्या वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी जामीन नाकारला. बीडचे जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील बालासाहेब काळे यांनीही या माहितीला दुजोरा दिला.
वाल्मीक कराडला बीड जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ व आता सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर वाल्मीकने आैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मागील महिन्यात तीन दिवस चाललेल्या सुनावणीनंतर खंडपीठाचे न्या. स्वप्नील घोडेस्वार यांनी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याचवेळी वाल्मीकच्या मुलांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली होती. त्यानुसार वाल्मीक कराडच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कराडचा जामिनासाठीचा अर्ज गुरुवारी फेटाळला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असून, इतर साथीदारही त्याच्यासोबत सध्या कारागृहात आहेत. यातील विष्णू चाटे हा लातूरमध्ये असूून, त्यानेही दोषमुक्तीसह लातूर कारागृहातून हलवण्यासाठी अर्ज केला आहे. तर कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मागील आठवड्यातील बीडमधील सुनावणीवेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी कृष्णा आंधळे हा दोनवेळा गावी येऊन गेल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले अशी अन्य आरोेपींची नावे आहेत.

