जालना – जिल्हयातील परतूर येथील ज्येष्ठ नेते सुरेश जेथलिया (६८) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा परिवार आहे. विधानसभा आणि विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे स्थानिक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले होते. जात, धर्म आणि पक्ष विरहित संबंध जोपासणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
जेथलिया यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता परंतु इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व निर्माण केले. स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणातून मराठवाड्यात जी कांही नेते मंडळी राज्य विधीमंडळापर्यन्त पोहोचली त्यामध्ये जेथलिया यांचे नाव आवर्जून उल्लेख करावा असे आहे. परतूर नगरपरिषदेच्या सदस्यपदी पहिल्यांदा बिनविरोध निवडून आल्यानंतर पुढील अनेक वर्षे या क्षेत्रातच त्यांचे ताब्यात ठेवताना कांग्रेस शिवाय अन्य पक्षांशीही तडजोडी केल्या.
परतूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पुढाऱ्यांची वर्चस्वाची लढाई आणि अहमहमिका पाहून त्यांनी १९९५ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत परतूर येथे त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. भावी काळात विधीमंडळ सदस्य होण्याची भावना ठेवून त्यांनी याच वेळी खऱ्या अर्थाने वाटचाल करण्यास सुरुवात केली होती. याच काळात ते शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांच्या आणि जालना जिल्हयातील अर्जुन खोतकर, शिवाजी चोथे आणि भास्कर अंबेकर यांच्या अधिक संपर्कात आले.
त्यानंतर शिवसेनेने जेथलिया यांना जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतरही विधीमंडळात जाण्याचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत आणि त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची विधान परिषद सदस्यपदी वर्णी लागली. जेथलिया विधानपरिषद सदस्य झाले त्यावेळी परतूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व भाजपकडे होते. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये परतूर विधानसभा मतदार संघ भाजपच्या वाट्याला आलेला असल्याने पुढील काळात आपल्याला शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव त्यांना होती.
त्यामुळे विधान परिषद सदस्य असताना परतूर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क वाढविण्यावर त्यांनी भर दिला. २००९ मध्ये जेथलिया परतूर विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले. यावेळी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बेबनाव आणि गटबाजी त्यांच्या मदतीला आली आणि ते विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आले. सलग दोन वेळेस निवडून आलेल्या आलेले भाजपचे आमदार लोणीकर आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव केल्यामुळे या निवडणुकीनंतर जेथलिया यांचे नाव जिल्हयातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले होते. त्यानंतर जेथलिया काँग्रेस पक्षात सक्रीय झाले. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही विधान सभा निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या.
परंतु या दोन्हीही निवडणुकांत त्यांचा भाजपचे उमेदवार लोणीकर यांनी पराभव केला. त्यानंतरच्या काळात जेथलिया जिल्हयातील काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रीय झाले. त्यांची जिल्हा कांग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांनी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली. परंतु या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविताना त्यांच्या समोर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अडचण आली. काँग्रेसची ही परंपरागत जागा आणि माजी आमदार असूनही महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली नाही.
त्याऐवजी महाविकास आघाडीने जालना जिल्हयाच्या आणि प्रामुख्याने परतूर विधानसभा क्षेत्रातील राजकारणातील मुरब्बी नेते अशी त्यांची ओळख होती. जेथलिया यांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी तळातील व्यक्तींशीही त्यांचा सहज संपर्क असे. पक्षविरहीत मित्रांबरोबर मैफल जमवून त्यामध्ये रमणारे ते नेते होते. टीका झाली तरी तरी त्याकडे दुर्लक्ष करून राजकारणात पुढे चालण्याचा त्यांचा स्वभाव होता.
