लसीकरणाला वेग न दिल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केवळ १९ टक्के लसीकरण झाल्याच्या कारणाने गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा प्रेमनाथ बिऱ्हाडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची कारवाई

औरंगाबाद: प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केवळ १९ टक्के लसीकरण झाल्याच्या कारणाने गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा प्रेमनाथ बिऱ्हाडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केले. वारंवार सूचना देऊनही मुख्यालयी न राहिल्याने लसीकरणाला वेग  मिळाला नसल्याचा ठपका बिऱ्हाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लसीकरण कमी झालेल्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली होती. राष्ट्रीय कार्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका वैद्यकीय अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. लसीकरण कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ही पहिलीच घटना आहे.

सिद्धनाथ वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविल्यानंतर तहसीलदारांनी पुन्हा सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली होती. तेव्हा डॉ. चित्रा बिऱ्हाडे गैरहजर होत्या. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची पहिली मात्रा घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण ६९ टक्के असून  दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण १९ टक्के एवढेच होते. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रात्रीचे लसीकरण हा कार्यक्रम सांगूनही हाती घेतला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

पेट्रोल पंप, मॉल येथे येणाऱ्यांचे दुसऱ्या मात्रेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत असे नियमही औरंगाबाद शहरात पाळले जात आहेत. लसीकरणाचा वेग कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका बैठकीत विचारणा केल्यानंतर विविध स्तरावर कारवाईचा बडगा उचण्यात येत आहे. एका बाजूला लसीकरणासाठी जनजागृती आणि दुसरीकडे कारवाई अशा प्रकारे काम सुरू करण्यात आले असून जिल्हा परिषदेनेही कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suspension medical officers vaccination ysh

ताज्या बातम्या