येथील शिक्षक प्रभाकर पवार यांच्या आत्महत्येचे प्रकरण थेट विधान परिषदेत धडकले. जिल्ह्यात पोलिसी अत्याचाराने जनता भयभीत झाली असून पवार यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली. काही महिन्यांपूर्वी वाघाळा येथील सुवर्णकार रवी टेहरे व सोनपेठ येथील विठ्ठल हाके यांनीही पोलिसी अत्याचारास कंटाळून आत्महत्या केल्याची बाब या वेळी त्यांनी निदर्शनास आणून दिली.
प्रभाकर पवार यांच्या आत्महत्येनंतर फौजदार सुधाकर जगताप यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. एखाद्या निरपराध शिक्षकाच्या जिवाचे मोल केवळ एखाद्या फौजदाराची बदली करण्याएवढे असू नये, अशा प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसांपासून उमटत आहे. या प्रकरणी जगताप यांना पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार बाबाजानी यांनी विधानमंडळ सचिवालयाकडे लेखी स्वरुपात विशेष उल्लेखाची सूचना सादर केली. पोलीस अधीक्षक ठाकर यांच्यावरही आमदार बाबाजानी यांनी कठोर टीका केली. ‘दोषी पोलिसांना पाठीशी घालणाऱ्या व वाढत्या अत्याचारास कारणीभूत नियती ठाकर यांनाही सहआरोपी म्हणून नोंदविल्याशिवाय पोलिसांना शिस्त लागणार नाही, तसेच अशा प्रकारांना आळा बसू शकणार नाही, याकडे या विशेष सूचनेत लक्ष वेधण्यात आले. पोलिसी अत्याचारामुळे जिल्ह्यात निर्माण झालेले भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण दूर करण्यासाठी अधीक्षिका ठाकर यांना निलंबित करून जनतेला निर्भय जगण्याचा आधार मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार बाबाजानी यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली.
गेल्या शनिवारी (दि. २) येथील विद्यालयातील शिक्षक प्रभाकर पवार यांच्या आत्महत्येची घटना घडली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. आपली कैफियत पोलिसांना सांगण्यास गेलेल्या पवार यांना फौजदार जगताप यांनी अपमानित केले. अपमान सहन न झाल्याने पवार यांनी आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी जगतापसह अन्य आरोपींची नावे स्पष्ट लिहिली. या प्रकरणी जगतापविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली.
विद्यालयातील शिक्षकांनीही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमदार बाबाजानी यांनी विधान परिषदेत या प्रकरणी विशेष उल्लेखाची सूचना सादर केल्याने हे प्रकरण आणखी चच्रेत आले. जगताप यांची केवळ पोलीस मुख्यालयात बदली करून त्यांना पाठीशी घातले जात आहे. अशा प्रकरणात कठोर कारवाई झाल्याशिवाय जिल्ह्यात कायद्याचे राज्य निर्माण होणार नाही, असे आमदार बाबाजानी यांनी लेखी सूचनेत म्हटले आहे.