औरंगाबाद : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या दोन कार्यक्रमात शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यावर अजित पवार यांनी टोलेबाजी केली. तर दुसरीकडे ‘मुप्टा’ या शिक्षक संघटनेचे सचिव सुनील मगरे यांना प्रोत्साहन देत तुम्ही घडय़ाळाबरोबर काम करा, असे म्हणत प्रोत्साहन देण्यात आले.
औरंगाबाद शहरात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन कार्यक्रम घेण्यात आले. एका कार्यक्रमाचे आयोजक शिक्षक आमदार विक्रम काळे होते. ३ हजार ३०० शाळांना आमदार निधीतून १० कोटी ३१ लाख रुपयांची पुस्तके शरद पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. अजित पवार यांनी भाषणाची सुरुवातच आमदार काळे यांना टोला लगावत केली. ते म्हणाले, ‘आमदार काळेंचे आमंत्रणच जरा दबकत स्वीकारले. तो कधी काय मागेल हे सांगता येत नाही.’ मध्यंतरी आमदार सतीश चव्हाण यांनी अयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर विक्रम काळे म्हणाले, ‘तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो मंत्रीच करा.’ आता मागण्या काय थांबत नाहीत. जुन्या पेन्शन योजनेपेक्षा नवी योजना योग्य आहे हे आकडेवारीसह पटवून सांगितले होते. पण पटतच नाही. हट्टीच आहे. पण पाठपुरावा करत असतो. त्यांची ही टोलेबाजी गमतीचा भाग म्हणून सोडून द्या असेही अजित पवार म्हणाले. पण पुढे याच कार्यक्रमासाठी मागण्यात आलेला १५ मिनिटांचा वेळ आणि कार्यक्रमासाठी लागलेल्या तासभरामुळे पवारांनीही विक्रम काळेंना टोला मारला. ते म्हणाले, चांगला कार्यक्रम आहे. १५ मिनिटे लागतील असे सांगण्यात आले. त्यामुळे आलो. आता एक तास झाला आहे. बहुतेक तुमच्या शिक्षक आमदरांचे गणित कच्चे आहे.
या कार्यक्रमानंतर ‘मुप्टा’ या शिक्षक संघटनेच्या सहाव्या अधिवेशनास शरद पवार व अजित पवार यांनी हजेरी लावली. या अधिवेशनात शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यात संघटनेचे सचिव सुनील मगरे यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या घडय़ाळाबरोबर यावे. त्यांचा सन्मान राखणे व त्यांच्याबरोबर राहू असे कार्यक्रमास उपस्थित असणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. पुढे अजित पवार भाषणास उभे राहिले. ते म्हणाले, आमदार विक्रम जिथे जाईल तिथे चिठ्ठी देतात. आता मागण्यांची चिठ्ठी दिली आहे. मी काय विसराळू आहे का, दरवेळी मला सांगायला. या पुढे चिठ्ठी दिली तर कामच करणार नाही तुझे.
या अधिवेशनात दाखविलेली एका लघु माहितीपटात मुप्टांनी केलेली आंदोलने दाखविण्यात आली. त्यात पोतराज आंदोलनही होते. अशी आंदोलने करू नका. हक्काने या समस्या सांगा, असे पवार म्हणाले. त्यावर सरकार भाजपचे होते असे विक्रम काळे खाली बसूनच म्हणाले. त्यावर अजित पवार पुन्हा म्हणाले, अहो, हे शिक्षक आहेत. त्यांनी अशी आंदोलने केली तर विद्यार्थीही असेच शिकतील. असे म्हणत त्यांनी विक्रम काळेंना पुन्हा टोला लगावला, असे खाली बसून मध्ये-मध्ये बोलणेही चुकीचेच आहे. हसत केलेली टोलेबाजी सुरू असताना शरद पवार यांच्या खुर्चीजवळ सुनील मगरे यांना आवर्जून बसविण्यात आले होते. त्यामुळे गमतीची टोलेबाजी आणि मगरेंना प्रोत्साहन असे चित्र मंगळवारच्या दोन्ही कार्यक्रमातून दिसून आले.