तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती सुरू केल्यानंतर सर्व क्षेत्रांनी तंत्रज्ञानासमोर नांग्या टाकल्या. मात्र, एकमेव संगीत क्षेत्राने आपला बाणा कायम ठेवत तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतच्या प्रगतीसाठी केला व तंत्रज्ञानाला शरण यायला लावले, हे संगीताचे वेगळेपण असल्याचे प्रतिपादन दैनिक ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.
अहमदपूर येथील नागोराव चामे स्मृती व्याख्यानमालेत ‘तंत्रज्ञान आणि संगीत’ या विषयावर संगोराम बोलत होते. संगोराम म्हणाले की, पृथ्वीतलावर माणसाचे इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण आहे. माणूस प्रगत होण्यासाठीच एक कोटी वष्रे लागली. निसर्गातील अन्य प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू वेगळा आहे. ज्या गळय़ातून आपण बोलू शकतो, त्यातूनच वेगळा आवाजही निघू शकतो हे कळू लागल्यावर संगीताचा जन्म झाला. जन्मल्यापासूनच स्वराचे आकर्षण सुरू झाले. प्रारंभीच्या काळात आवाज साठवून ठेवण्याची सुविधाच नव्हती. १८५० ते २००० या दीड शतकात तंत्रज्ञानाने जे शोध लावले त्यानुसार त्याचा उपयोग संगीतासाठी झाला. पूर्वी संगीत ऐकण्याची संधी रेडिओवर उपलब्ध होती. मात्र, आपल्याला हवे ते गाणे हवे तेव्हा ऐकण्याची सोय रेडिओवर उपलब्ध नव्हती. रेडिओवर संगीत लोकांना ऐकता येत असे. एडिसनने तंत्रज्ञानात क्रांती करून ध्वनिमुद्रणाचा शोध लावला.
तानसेन उच्च दर्जाचा गायक होता, हे आपण ऐकून आहोत. मात्र, त्याचा आवाज ऐकण्याची संधी नंतरच्या पिढीला उपलब्धच झाली नाही. दीड मिनिटाचे ध्वनिमुद्रण उपलब्ध झाल्यानंतर पहिल्यांदा हरियाणा येथून महाराष्ट्रात स्थायिक झालेले उस्ताद करीमखाँ हे मूळचे कैराना गावचे. त्यातून महाराष्ट्रात संगीतातील किराणा घराणे सुरू झाले. त्यांनी पहिल्यांदा दीड मिनिटात गाण्याचे आव्हान पेलले. त्यांच्या समकालीन असलेले विष्णू दिगंबर पलुस्कर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर अशी दिग्गज मंडळी होती. मात्र, त्यांचे गायन ध्वनिमुद्रित होऊ शकले नाही.
पूर्वीच्या काळी संगीत एक तर दरबारात अथवा वेश्या वस्तीत चालत असे. दोन्ही ठिकाणी उच्च दर्जाचे संगीत होते. दरबारात सामान्यांना प्रवेश नव्हता, तर वेश्या वस्तीत गेल्यामुळे बदनामी अंगाला चिकटेल म्हणून लोक जात नसत. टेपची सुरुवात झाल्यानंतर हळूहळू संगीत सामान्यांपर्यंत यायला लागले. १९३५ मध्ये टेपरेकॉर्डरचा शोध लागला. पूर्वी पाश्र्वसंगीत नव्हते. त्यामुळे गायक-वादक यांना एकत्रित संगीत ध्वनिमुद्रित करावे लागत असे. एखाद्याची छोटीशी चूकही झाली तर त्याचे परिणाम सर्व मंडळींना एकत्र भोगावे लागत. अशा काळात लता मंगेशकरांसारख्या कलावंताला अनेक दर्दभऱ्या गीतांसाठी अनेकदा रिटेक द्यावा लागत असे. चित्रपटांत काम करणाऱ्या नटाला चेहऱ्यापेक्षा त्याचा आवाज चांगला असणे यालाच प्राधान्य होते, कारण अभिनय वेगळा व गाणे वेगळे असे त्या काळात होत नसे.
कालांतराने पाश्र्वसंगीताची सोय उपलब्ध झाल्यानंतर मग वेगळय़ा चेहऱ्याच्या नटाला प्राधान्य मिळाले. तंत्रज्ञानाने संगीताला बाजारपेठ मिळवून दिली. दीड मिनिटाच्या ध्वनिमुद्रणानंतर ३ मिनिटे, ८ मिनिटे अशी प्रगती होत २० मिनिटांची क्षमता झाली आणि लाँगप्रेईंग रेकॉर्डचा जमाना सुरू झाला, जो अभिजात संगीतासाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर कॅसेट, सिडी, पेनड्राईव्ह, संगणकावरच गाणे साठवून ठेवणे व साठवलेले संगीत एका क्षणात इकडून तिकडे पाठवणे ही सोय तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली. तंत्रज्ञानात झालेले बदल लक्षात घेऊन त्यावर संगीत स्वार झाले व संगीतक्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर संगीताचा दर्जा सतत वíधष्णू होत गेला. संगीताचे हे वेगळेपण समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राम तत्तापुरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनल चामे यांनी परिचय करून दिला. प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैभव रेड्डी यांनी आभार मानले.