गावातील कोरडय़ा विहिरीत टँकरने पाणी सोडताच पाणी शेंदून घेण्यास झुंबड उडते. हंडाभर पाणी जास्त मिळावे, या साठी विहिरीवर आलेली मुले गर्दीत सापडून विहिरीत पडून ४ मुली, २ मुले, २ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. पाण्यासाठी घरातील कर्त्यां पुरुषांबरोबरच मुलेही विहिरी, बारवांवर जाऊन पाणी भरतात. हातपंपावर रांगेत दिवसभर उभे राहून पाणी भरत असल्याने पाणीटंचाई महिला आणि बालकांच्या जीवावर उठली आहे. तीन महिन्यांत विहिरीत पडून व पाणी भरताना उष्माघातामुळे एकूण दहाजणांचा बळी गेला.
जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण चित्र निर्माण झाले. साडेआठशे टँकरद्वारे वाडी-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात असल्याने गावेची गावे टँकरच्या मागे धावत आहेत. टँकरने गावातील कोरडय़ा विहिरीत दिवसातून एक वा दोन पाण्याच्या खेपा टाकल्या जातात. हजारोच्या संख्येने नागरिकांची विहिरीवर पाणी शेंदून घेण्यासाठी झुंबड उडते. महिला, लहान मुलांसह विहिरीतून पाणी शेंदण्यास तुटून पडतात. हंडाभर पाणी जास्तीचे मिळावे, या साठी घरातील शाळकरी मुलांवर दिवसभर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडल्याचे चित्र गावागावातून दिसत आहे.
घरातील कर्ती माणसे कामासाठी बाहेर गेल्यानंतर दिवसभर उन्हात हातपंपावर, विहिरीवर हंडा घेऊन शाळकरी मुले उभी राहत असल्याने पाणीटंचाईची झळ महिला आणि शाळकरी मुला-मुलींना बसू लागली आहे. मागील तीन महिन्यांत पाणी बळी गेलेल्या एकूण दहापकी विहिरीत पडून चार मुली, दोन मुलांसह दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील साबलखेडा येथील योगिता देसाई (वय १०) या मुलीने दिवसभर हातपंपावर पाणी भरल्यानंतर रात्री तिची तब्येत खराब होऊन तिचा मृत्यू झाला. दिवसभर उन्हामध्ये राहिल्याने उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. गोदावरी नदीच्या काठावरील गेवराई तालुक्यात सर्वाधिक आतापर्यंत सहा पाणीबळी गेले आहेत. कोल्हार येथील माऊलीनगरमधील गौरी रघुनाथ भुसे (वय ८) ही मुलगी पाणी शेंदताना विहिरीत पडून मरण पावली. बागिपपळगाव येथील जयश्री नामदेव कांबळे (वय ११) व जातेगाव येथील कोमल जगताप (वय ११) या दोन्ही मुली गावातील विहिरीवर पाणी शेंदताना बळी गेल्या.
टँकरचे पाणी विहिरीत पडताच गावातील मोठी माणसे, मुले एकच गर्दी करतात. त्यात ढकलाढकली होऊन मुले विहिरीत पडण्याचे प्रकार वाढले असून काहींचा त्यात बळी गेला, तर तळणेवाडी येथील खरसाडे वस्तीवरील छबुबाई बाबुराव खामकर (वय ४०) ही महिला पाणी शेंदताना विहिरीत पडली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. खरसाडे वस्तीवर कधी तरी टँकरच्या पाण्याची एक खेप येते. पाण्याच्या शोधात गेलेल्या छबुबाईचा त्यातून बळी गेला, तर कांबी मंजरा येथील साहेबराव दादाराव अडागळे या वृद्धाचा आणि केकत पांगरी येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ओढवला. तालुक्यात १०५ टँकरने पाणीपुरवठा होत असून गावागावात टँकरच्या मागे आणि विहिरीवर मोठय़ा संख्येने नागरिक एकच गर्दी करीत असल्याने पाणी बळी जाऊ लागले आहेत. बीड तालुक्यातील घाटसावळी येथील कोमल लांडे (वय १७) ही मुलगी गावाशेजारील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरल्याने पडून तिचा मृत्यू झाला. अंबाजोगाई येथील शेख अश्पाक ऊर्फ गप्पू (वय १६) हा मुलगा घरी आंघोळीस पाणी नसल्याने कृषी विद्यालय परिसरातील विहिरीवर गेला असता त्याचाही बुडून मृत्यू झाला. केज तालुक्यातील विडा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सकाळी सकाळी टँकरने पाणी विहिरीत सोडल्यानंतर सचिन महादेव केंगार (वय ११) हा पाणी शेंदताना विहिरीत पडल्याने मरण पावल्याची घटना घडली.
ग्रामीण भागात शाळांना सुट्टय़ा असल्या, तरी पाणीटंचाईमुळे घराघरातून दिवसभर पाणी मिळविण्याची जबाबदारी लहान मुला-मुलींवर आली आहे. गावागावात अगदी पाच वर्षांच्या मुलापासून लहान भांडे, हंडे, कळशी घेऊन मुले हातपंपावर, विहिरीवरून, मिळेल त्या ठिकाणावरून पाणी शेंदून आणतात. गावाशेजारी कोरडय़ा पडलेल्या शेकडो फूट विहिरीत मुलांनाच दोरखंडाला बांधून सोडून पाणी मिळवले जाते. प्रशासकीय यंत्रणा लहान मुलांना विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाठवू नये, असे आवाहन करून आपली जबाबदारी टाळत असली, तरी जिल्ह्यात होणारे पाणीबळी प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाच्या दुष्काळामुळेच ओढवल्याचेही आता स्पष्ट होऊ लागले आहे.

Struggle of women in Borpada village of Trimbakeshwar taluka for water
कशासाठी ? हंडाभर पाण्यासाठी…
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
7 year old boy drowned in swimming pool marathi news
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना