छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी साखर कारखान्याची ३७ हेक्टर ५३ आर म्हणजे सुमारे ९३ एकर जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत याच्या भैरवनाथ शुगर यांच्याकडून तेरणा कारखाना सध्या चालविण्यात येत आहे. या कारखाान्यावर ४०० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.
हे कर्ज मिळत नसल्याने जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. या अनुषंगाने निविदा काढण्यावर संचालक मंडळात चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील म्हणाले तेरणा कारखान्यावर ४०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कारखान्याकडून आतापर्यंत दरवर्षी भाड्यापोटी सहा कोटी रुपये मिळतात.
या गतीने बँकेचे पैसे वसुल झाले तर जिल्हा बँक कधीच तोट्यातून बाहेर येणार नाही. त्यामुळे जमीन विक्रीची कारवाई करावी असा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा बँकेकडे ठेवीदारांची रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत. सुमारे ७०० कोटी रुपये देणी बाकी आहेत. आतापर्यंत भैरवनाथ शुगरकडून १६ कोटी रुपयांचा भरणा जिल्हा बँकेत करण्यात आला होता.
मात्र, याच बँकेतून कारखान्याच्या भविष्य निवार्ह निधी खात्यात भरण्यात आले. त्यामुळे हाती रक्कम काही शिल्लक राहत नाही. दरवर्षी बँकेचे संचालक वसुलीसाठी प्रयत्न करत नाहीत, असा ठपका येत असल्याने या वर्षी रक्कम वसूल करण्यासाठी जमीन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ तेरणाच नाही तर जिल्हा बँकेने तुळजाभवानी साखर कारखान्यास १९५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.
तसेच पीक कर्जही आहे. यामुळे या कारखान्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे बाबुराव पाटील म्हणाले, ‘जरी थोडी रक्कम जिल्हा बँकेस प्राप्त झाली तरी बँकची कर्जरक्कम वसूल होणार नाही.’ साखर तारण कर्ज तसेच अन्य कोणत्याही स्वरुपाचे कर्ज परतफेड मिळत नसल्याने आता जमीन विक्रीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तेरणा कारखान्याच्या माध्यमातून धाराशिव तालुक्याचे राजकारण तापत जात असल्याने जमीन विक्रीचा हा निर्णय अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ‘ सरफेसी ’ कायद्यान्वये होणाऱ्या कारवाईसाठी जमीन विक्रीच्या निविदा काढण्यासाठी राज्य सरकारला परवानगी मागितली जाईल. ती येताच कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.
