छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय व राज्यस्तरावरील शिक्षक पात्रता परीक्षा ७ व ८ फेब्रुवारी रोजी निश्चित झालेली असताना गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे मतदानही नियोजित तारखेऐवजी दोन दिवस म्हणजे ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजीच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने लाखो शिक्षकांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. आता निवडणूक विभागाला पत्र पाठवून पुन्हा तारीख बदलण्याची विनंती करणारे पत्र तयार झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यच केल्याने त्यासाठीची तयारी सुरू झालेली होती. ७ व ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशपातळीवर निश्चित झालेली होती. तर महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ५ फेब्रुवारी घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु आता गुरुवारी नव्याने ७ फेब्रुवारी रोजी मतदान व ९ फेब्रुवारीला मतमोजणीची तारीख जाहीर करण्यात आल्याने परीक्षा अनिवार्य असणाऱ्या शिक्षकांसह डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांपुढेही पेच निर्माण झाला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेत २ हजार २०० शिक्षक व काही प्राध्यापक असून, डीएड. बीएडचे विद्यार्थीही आहेत. त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. पहिली ते चौथी व सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांना दोन दिवसांची टिईटी, सीटिईटी परीक्षा द्यावी लागणार असून, त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भाने निवडणूक विभागाला पत्र लिहून शिक्षकांची अडचण सांगून कुठल्याही एका तारखेत बदल करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शुक्रवारी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राज्य सरकारनेही पुढे येऊन पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी सर्व शिक्षक संघटनांकडून डिसेंबर महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता. परंतु परीक्षा अनिवार्यच केल्याने शिक्षक तयारीला लागले होते. परंतु पुन्हा मतदान प्रक्रियेत सहभागी शिक्षकांपुढे तारीख बदलल्याने पेच निर्माण झाला आहे.