जिल्हा बँकेच्या फेडरेशनची मागणी

नोटाबंदीनंतर औरंगाबाद जिल्हा बँकेत ४० कोटी रुपये बचत खात्यांमध्ये जमा झाले आहेत. राज्यात साडेतीन हजार कोटी रुपये अशाप्रकारे जमा झाले आहेत. बँकेमध्ये जमा झालेल्या रकमेवर व्याज देणे बँकांना बंधनकारक आहे. जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास सरकारने मनाई केल्याने या बचत रकमेचे व्याज सरकारने द्यावे, अशी मागणी आज लेखी स्वरूपात सरकारकडे करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या फेडरेशनने अशा प्रकारचा लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शुक्रवारी दिली.

[jwplayer poPcqTHM]

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या १३८ शाखांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर ४० कोटी रुपये शेतकरी सभासदांनी बचत खात्यांमध्ये जमा केली. बचत खात्यावरील या जमा रकमेवर व्याज द्यावे लागणार आहे. एवढी मोठी रक्कम जिल्हा बँकेत आल्यास त्याच्या ठेवी अन्य राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ठेवल्या जातात. आता राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ही रक्कम बचत ठेव म्हणून भरल्यासही अपेक्षित व्याज मिळणार नाही. परिणामी तोटा वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे या बचत खात्यावरील व्याज द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. बागडे हे औरंगाबाद बँकेचे संचालक म्हणून उपस्थित होते. त्यांनीही बँकेला भरुदड होत असल्याचे मान्य केले. या अनुषंगाने व्याजाची रक्कम मिळाल्यास जिल्हा बँका नफ्यात राहतील. अचानक वाढलेल्या बचत खात्यातील रकमांमुळे मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

[jwplayer voXexKMV]