महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हर्सूल येथिल रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याबाबत पालिकेला जाग यावी यासाठी येथिल विद्यार्थ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला. तीन महिन्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात पालिकेला निवेदन देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पाऊस सुरु झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याने विद्यार्थ्यांनी ही शक्कल लढवली.

हर्सूल येथील भगतसिंग नगर ते पिसादेवी रोड या रस्त्यावर जवळपास २० ते २५ हजार लोकांची वस्ती आहे. तसेच न्यू हायस्कूल हर्सूल, संस्कार बालक मंदीर, अगस्ती प्राथमिक शाळा, नाथ अकॅडमी शाळा असून या सर्वांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. महानगरपालिकाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसामुळे जागोजागी जे खड्डे पडले आहेत त्यात पाणी आणि चिखल यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा गांधीगिरी करत निषेध केला.

रस्त्याच्या समस्येसंदर्भात तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि महापौर बापू घडामोडे यांना वार्डातील नागरिकांनी लोकांना भेट देऊन रस्त्याची समस्या पुढच्या १० ते १५ दिवसात मार्गी लावतो असे सांगण्यात आले होते. त्याची भेट होऊन जवळपास ३ महिने होत आले आहेत आणि रस्ता मात्र जसाच्या तसाच आहे. महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत मनपा विरोधात आंदोलन केले.