औरंगाबाद : व्याजाने घेतलेले पैसे परत दिले नाही तर तुझ्या कुटुंबियांचे अपहरण करून त्यांना जिवे मारू, अशी धमकी देत तीन खासगी सावकारांनी एका युवकाकडून जवळपास २ कोटी १७ लाख ३० हजार ८७५ रूपये उकळले. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या काळात घडला असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गंगाधर बुगदे (वय २८,रा.श्रीविहार कॉलनी, देवळाई चौक, बीड बायपास) याने खासगी सावकारी करणाऱ्या संकेत उर्फ सत्यम मुंडलीक (रा.गुलमंडी), वैष्णव पाटील (रा.देवगिरी महाविद्यालयासमोर), सुयोग वैद्य आणि इतरांकडून व्यवसाय करण्यासाठी वेळोवळी करून १ कोटी २४ लाख ३ हजार ६११ रूपये २४ टक्के व्याजाने घेतले होते. दरम्यानच्या काळात संकेत उर्फ सत्यम मुंडलीक, वैष्णव पाटील, सुयोग वैद्य व इतरांनी ऋषिकेश बुगदे याला बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्स मैदान व इतर ठिकाणी नेवून इतरांना पैशासाठी बेदम मारहाण करीत असल्याचे भीतीदायक व्हिडीओ आणि फोटो दाखविले. तसेच ऋषिकेश बुगदे यांच्या बँक खात्यावरून २ कोटी १७ लाख ३० हजार ८७५ रूपये स्वतःच्या, नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यावर वळविण्यास भाग पाडले. त्यानंतर आणखी ९३ लाख २७ हजार २६४ रूपये बाकी असल्याचे सांगून ऋषिकेश बुगदे याच्याजवळील ३ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागीने, आयफोन, आयवॉच बळजबरीने आणि जीवे मारण्याची धमकी देत काढुन घेतले होते.

या प्रकरणी ऋषिकेश बुगदे याचे वडील गंगाधर अण्णासाहेब बुगदे यांनी आर्थिक गुन्हेशाखेत तक्रार दिली होती. आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी तपास करून अहवाल दिल्यावर जीवे मारण्याची धमकी देत फसवणूक केल्याप्रकरणी संकेत उर्फ सत्यम मुंडलीक, वैष्णव पाटील, सुयोग वैद्य व इतरांविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हेशाखेच्या सहाय्यक निरीक्षक तृप्ती तोटावार करीत आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatening kill family members charges filed private lenders ysh
First published on: 15-06-2022 at 00:15 IST